ठाणा शाळेचे आयुक्तांनी केले कौतुक

0
14

आमगाव दि. ६ : विभागीय आयुक्त अनुप कूमार हे जिल्हयाचे दौऱ्यावर आले असता त्यांनी आमगाव तालुक्यातील ठाणा येथील उच्च प्राथमिक शाळेला भेट दिली. शाळेचा सुशोभित व स्वच्छ परिसर पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी मुख्याध्यापक जी.टी.कावळे यांचेकडून माहिती जाणून घेतली. गावातील मुलांची शाळेमध्ये १०० टक्के उपस्थिती असली पाहिजे यासाठी त्यांनी मुख्याध्यापकांना सांगितले. गावातील कोणताही मुलगा शाळाबाह्य नसल्याचे मुख्याध्यापकांनी आयुक्तांना सांगितले. शाळेमध्ये कोणकोणत्या चाचण्या घेण्यात येतात. शिक्षकांचे रिक्त पदे, ज्ञानरचना कार्यक्रम, शालेय पोषण आहार, शाळा व्यवस्थापन समिती याबाबतची माहिती त्यांनी जाणून घेतली.
मुख्याध्यापक श्री कावळे यांनी शाळेमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत असून दैनदिन परिपाठ, नीटनेटकेपणा, बॅचेस लावलेले विद्यार्थी, सामान्य ज्ञानावर आधारीत दरमहा परिक्षा, शालेय पोषण आहार, किचनसेटचा योग्‍य उपयोग, शालेय पोषण आहारातील मेनू याबाबतची माहिती दिली.
यावेळी आयुक्तांनी दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्याशी संवाद साधला. बाराखडी, वस्तूंची ओळख तसेच अभ्यासक्रमात करण्यात येत असलेले प्रयोग याबाबतची माहिती त्यांनी विद्यार्थ्याकडून जाणून घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, ठाणा सरपंच अनिता आगरे, मुख्याध्यापक जी.टी.कावळे यांची उपस्थिती होती.