निंबाच्या सहेली ग्रामसंस्थेला विभागीय आयुक्तांची भेट

0
12

सालेकसा,दि.6-विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी सालेकसा तालुक्यातील निंबा या गावाला भेट देवून महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे कार्यरत सहेली ग्रामसंस्थेला भेट दिली. यावेळी त्यांनी आरजू महिला बचत गटाने तयार केलेल्या लाकडी व बांबूपासून उत्पादित काष्टशिल्पाची पाहणी करुन बचतगटाचे व ग्रामसंस्थेचे कौतूक केले.
निंबा या गावामध्ये २२ महिला बचत गट कार्यरत असून ३०८ महिला बचतगटाच्या सदस्या आहेत. बचत गटाच्या माध्यमातून काष्टशिल्प वस्तू तयार करणे, शेळीपालन, हळद तयार करणे, कुकूटपालन, श्री पध्दतीने धान लागवड, बिछायत केंद्र, पीठ गिरणी,कापड दुकान, बचत गटातील महिला चालवित असल्याची माहिती यावेळी माविमचे तालुका कार्यक्रम समन्वयक अनिल गायकवाड यांनी दिली.
नागपूर येथील दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र येथे आयोजित करण्यात येणाऱ्या महिला मेळाव्याला निंबा येथील महिलांनी सहभागी होण्याचे निमंत्रण विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी निंबा येथील महिला बचत गटातील महिलांना दिले. या मेळाव्यात महिलांनी रेला, दंडार याचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रदर्शन करावे, बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची, साहित्याची विक्री करण्यासाठी या मेळाव्यात गोंदिया जिल्हयात ४ स्टॉल देण्यात येईल. असेही आयुक्तांनी उपस्थित महिलांना सांगितले.
यावेळी पशू सखी ललिता वडगाये यांनी पशूसखी म्हणून शेळ्यांचे लसीकरण, त्यांच्यावर प्राथमिक उपचार, महिलांना व्यावसायिक दृष्टीकोन समजावून सांगत असल्याची माहिती दिली. एक बोकूळ संगोपन केंद्र निंबा येथे सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. गावातील महिलांनी पाण्याची स्थिती गंभीर असल्यामुळे पाणी विकत घ्यावे लागत असल्याची बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे पाणीपुरवठा योग्य व सूरळीतपणे व्हावा यासाठी विहीर अधीग्रहण करुन निंबा ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ येऊ नये यासाठी तातडीने पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी गटविकास अधिकाऱ्यांना दिले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
आयुक्तांच्या भेटीदरम्यान निंबा येथील ग्रामसंस्थेंच्या कार्यालयात महिला आर्थिक विकास महामंडळाचे सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन देशमुख, तालुका कार्यक्रम व्यवस्थापक अमोल गायकवाड, क्लस्टर व्यवस्थापक शालू साखरे, संगिता मस्के, सहयोगीनी मंदा करंडे, सहेली ग्रामसंस्थेच्या अध्यक्षा उर्मिला लिल्हारे, सचिव शारदा तुरकर, समुदाय साधन व्यक्ती मंजू पटले, लेखापाल भूमिता पटले यांचेसह गावातील बचतगटातील महिला सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.