स्पर्धा परीक्षा ही चळवळ व्हावी– दयानंद मेश्राम

0
23

अर्जुनी मोरगाव,दि.06ः राजपत्रित, अराजपत्रित व इतर उच्च पदावर आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्र , राज्याबाहेरील अधिकारी येतात. परंतु आपल्या स्थानिकांमधून अधिकारी दिसत नाही .ही खेदाची बाब आहे. शिक्षणानंतर स्वतःला एमपीएससी, यूपीएससी व इतर परीक्षांमध्ये झोकून द्या .स्वतःचे अस्तित्व तयार करा. आपल्याकडे कौशल्य आहे. परंतु पश्चिम महाराष्ट्र व परराज्यात स्पर्धा होतात. त्या स्पर्धा साठी आपल्याकडे मार्गदर्शन नाही आपल्याकडे स्पर्धा परीक्षेची चळवळ व्हावी त्यातून अधिकारी घडवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावे यासाठी आपण सदैव आपल्याला सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य दयानंद मेश्राम यांनी केले.
शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालय अर्जुनी मोरगाव येथे 4 फरवरीला करिअर कट्टा व स्टुडन्ट राईट्स फाउंडेशन नागपूर यांचे वतीने स्पर्धा परीक्षा व अन्य क्षेत्रातील संधी या विषयावर विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य मार्गदर्शक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य दयानंद मेश्राम, स्टुडन्ट राईट फाउंडेशन चे अध्यक्ष उमेश कोर्राम, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूरचे प्राचार्य बोरकर, शिवप्रसाद सदानंद जयस्वाल महाविद्यालय अर्जुनी मोरगाव चे प्राचार्य मोहतुरे, वाचन कट्ट्याचे संयोजक प्रा. विलायतकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना उमेश कोर्राम म्हणाले की, शिक्षणानंतर प्रत्येक विद्यार्थी नोकरीच्या मागे धावत असतो. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा तयार झाली आहे. स्पर्धेला समोर जायचे असेल तर अभ्यास नेमका कसा करायचा त्याचे एक मूलमंत्र जोपासा. आता नोकऱ्या सहजासहजी मिळत नाही .केंद्र व राज्याच्या उच्चपदस्थ नोकरी पासून पोलीस, बाबूगिरी पर्यंत नोकरीमध्ये स्पर्धा तयार झालेली आहे. यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी तयारी करावी. परीक्षेचे अभ्यासक्रम, संदर्भीय पुस्तके व इतर पुस्तकाचे वाचन करावे. बारावी किंवा पदवीनंतर बार्टी, सारथी, महाज्योती व इतर संस्थांकडून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी अर्थसहाय्य मिळते. जिल्हास्तरावर पुढील वर्षापासून ओबीसी करिता वसतीगृह उपलब्ध होणार आहे. फक्त अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रच नाही तर जेएनयु, आयआयटी सारख्या इतर संस्था आहेत त्यात स्वतःला सिद्ध करा.आपणाला सहकार्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नरत असल्याचे ते म्हणाले.
दयानंद मेश्राम म्हणाले की, स्पर्धा परीक्षा म्हणजे शहाणपण सिद्ध करण्याची परीक्षा आहे. 12वी किंवा पदवी मध्ये जास्ती मार्क मिळविले की स्पर्धा मध्ये यशस्वी होतो असे नाही. कमी मार्क मिळाले तरी स्पर्धा परीक्षात यश येते. यासाठी सातत्य हवे. कमी वेळामध्ये आपण पेपरला कसे सामोरे जावे. स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त एमपीएससी किंवा यूपीएससी नव्हे तर रेल्वे, पोलीस, बँकिंग, संरक्षण व इतर क्षेत्रात अनेक संधी आहेत. याकडे आपण गांभीर्याने बघणे गरजेचे आहे पश्चिम महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेचे स्तोम माजले आहे तर आपल्या विदर्भातील विशेषतः भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात विद्यार्थ्यांची अनास्था आहे.स्पर्धा परीक्षा म्हणजे खूप अवजड, अजस्त्र, किचकट असल्याचा भ्रम आहे. हा भ्रमाचा भोपळा फोडण्यासाठी आपली तयारी हवी. अभ्यास हवा. स्पर्धा परीक्षेचे मागील पाच वर्षाचे पेपर काढावेत व ठराविक वेळेत ते कसे सोडवावे त्याचा नेहमी सराव करावा. चालू घडामोडी, लोकसत्ता, द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, सारखे दैनिक व इतर मासिकं वाचावेत. वाचण्याची आवड तयार करावी, तालुकास्तरावर अभ्यासिका निर्मितीसाठी संस्था किंवा लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे . विद्यार्थ्यांसोबत पालकांनी सुद्धा आता पुढाकार घ्यावा लागेल. पूर्व विदर्भातून राजपत्रित अधिकारी घडवण्यासाठी आपले सहकार्य, मार्गदर्शन लाभणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शासकीय अभिक्रियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य बोरकर म्हणाले की, आपल्यातून अधिकारी घडावे यासाठी व क्षेत्राची ओढ असल्याने आपल्या महाविद्यालयात मार्गदर्शन आयोजित केले. इथुन अधिकारी घडावे, स्वतःचा, महाविद्यालयाचा गौरव व्हावा यासाठी आपला प्रयत्न आहे . शिवप्रसाद सदानंद जायसवाल महाविद्यालयाचे प्राचार्य मोहतुरे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येत विद्यार्थी उपस्थित होते.