महाज्योती तर्फे एमपीएससी आणि युपीएससी परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता अर्ज करण्याचे आवाहन

0
16

गोंदिया,दि.29 :  महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था आहे. संस्थेमार्फत राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात समान संधी प्राप्त व्हावी याकरीता विविध योजना राबवत असते. वर्ष 2023-24 साठी महाज्योतीतर्फे एमपीएससी आणि युपीएससी परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता अर्ज मागविण्यात आलेले आहे.

      एमपीएससी परिक्षापूर्व प्रशिक्षण– एमपीएससी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी  मोफत ऑफलाईन व अनिवासी पध्दतीने महाज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरीता इच्छुक विद्यार्थांकडून महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. प्रशिक्षणाचा नियोजित कालावधी 11 महिने आहे. प्रशिक्षणाकरीता निवड झालेले विद्यार्थी ज्या दिनांकास संस्थेत प्रशिक्षणाकरीता रुजू होतील त्या दिनांकापासुन महाज्योतीच्या धोरणानुसार प्रत्यक्ष प्रशिक्षणास 75 टक्के उपस्थिती असणाऱ्यांनाच प्रतिमाह 10 हजार रुपये  विद्यावेतन लागू होईल. एकवेळ आकस्मिक खर्च 12 हजार रुपये देण्यात येईल.

      युपीएससी परिक्षापूर्व प्रशिक्षण– युपीएससी परिक्षापूर्व प्रशिक्षण योजनेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एकूण 11 महिन्यांचे पूर्व, मुख्य तसेच व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेकरिता दिल्ली येथील नामांकित प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षणा सोबत अभ्याससाहित्य घरपोच देण्यात येईल. पुणे येथे प्रशिक्षणाकरिता निवास व भोजन व्यवस्था म्हणून उमेदवारांना 10 हजार रुपये प्रतिमाह विद्यावेतन व एकवेळ आकस्मिक खर्च 12 हजार रुपये देण्यात येईल. दिल्ली येथे ऑफलाईन प्रशिक्षणाकरिता निवास व भोजन व्यवस्था म्हणून उमेदवारांना 13 हजार रुपये प्रतिमाह विद्यावेतन व एकवेळ 18 हजार रुपये आकस्मिक खर्च देण्यात येईल.

      प्रशिक्षणासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे– अर्ज करतांना विद्यार्थ्यांनी त्यांचे आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, पदवीचे प्रमाणपत्र, मार्कशीट, अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षी उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक जोडावे. पासबूक किंवा रद्द केलेला धनादेश जोडावा.

        प्राप्त अर्जाची निकषानुसार छाननी करण्यात येईल. विद्यार्थ्यांची राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या धर्तीवर व अभ्यासक्रमानुसार चाळणी परीक्षा घेण्यात येईल. चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांकनानुसार मेरीटच्या आधारे व आरक्षित जागांच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

        विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in  या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील Application Training 2023-24 यावर जाऊन सर्व अटी व शर्तीचे पालन करुन 10 एप्रिल पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा, असे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक यांनी केले आहे.