जि.प. शाळांवरील पालकांचा विश्‍वास व्यर्थ जाणार नाही

0
9

गोरेगाव : संपूर्ण महाराष्ट्रात गोंदिया जिल्ह्यातून ‘गुढी पाडवा, शाळा प्रवेश वाढवा’ या उपक्रमांतर्गत बहुसंख्य पालकांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेऊन विश्‍वास दर्शविला.त्यांचा विश्‍वास व्यर्थ जाणार नाही. कारण उच्च दर्जा व गुणवत्ता आता जिल्हा परिषदेच्या शाळांत आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद शिक्षण सभापती पी.जी. कटरे यांनी केले.
जवळील ग्राम हिरडामाली येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने शुक्रवारी आयोजित तालुकास्तरीय कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद््घाटन शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती दिलीप चौधरी, गटशिक्षणाधिकारी यशवंत कावळे, सरपंच कुंता बघेले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश कुंभलकर, अतुल कटरे, विस्तार अधिकारी टी.बी. भेंडारकर, एस.बी. खोब्रागडे, विषयतज्ज्ञ गोविंद ठाकरे, सुनील ठाकूर, जी.जे. बिसेन उपस्थित होते.
जि.प.च्या शिक्षण विभागातर्फे गुढीपाडव्याच्या पावन मुहूर्तावर शाळा प्रवेश वाढविण्याचा अभिनव उपक्रम जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांच्या प्रेरणेतून हाती घेण्यात आला असून यामुळे विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात एकाच दिवशी २0 हजार विद्यार्थी प्रवेशीत झाले असून प्रचंड उत्साह ग्रामीण भागात दिसून येत आहे.आज शिक्षणाची गुढी जि.प. शाळेत उभारली असून ग्रामीण विद्यार्थ्यांना दज्रेदार शिक्षण मिळणारच अशी ग्वाही कार्यक्रमाचे उद्घाटक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी दिली. पंचायत समिती सभापती चौधरी यांनी, जिल्हा परिषद शाळेचा बदललेला दर्जापाहून खूप आनंद होत असल्याचे मत व्यक्त केले.
प्रास्ताविक मुख्याध्यापक वाय.एस. भगत यांनी मांडले. संचालन राहुल कळंबे यांनी केले. आभार वीरेंद्र पटले यांनी मानले.