आत्मसमर्पित राजूलाची 12 वीच्या परिक्षेत यशस्वी भरारी

0
33

पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे व श्रीमती समृद्धी पिंगळे यांचे हस्ते सत्कार

गोंदिया,दि.27ः-नक्षलवाद्यांनी 2017 मध्ये (KKD दलम, पक्ष सदस्य म्हणून)जबरीने नक्षल चळवळीत ओढलेल्या आत्मसमर्पित नक्षल कु. राजुला(अनिता) रवेलसिंग हिडामी, वय 21 वर्षे राहणार – लवारी, पोस्ट- पुराडा,ता.कुरखेडा,जि.गडचिरोली हिने नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता 12 वी च्या परीक्षेत 46% गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याने पोलीस अधिक्षक निखील पिंगळे व त्यांच्या सहचारिणी समृध्दी पिंगळे यांच्या हस्ते राजुलाचा सत्कार करण्यात आला.

राजुलाला नक्षलवाद्यांनी जबरीने नक्षल चळवळीत जुलै 2017 (KKD दलम, पक्ष सदस्य म्हणून), सहभागी करून घेतले होते. परंतू नक्षलवाद्यांबरोबर राहून जिवन जगत असतांना तिला येणाऱ्या अडचणीमुळे ती कंटाळली होती. तीला नक्षल (संघटनेत) चळवळीत स्वारस्य नव्हते. त्यामुळे तिने गोंदिया जिल्हा पोलिसांसमोर 24 आँगस्ट 2018 रोजी आत्मसमर्पण केले होते.आत्मसमर्पणानंतर पोलीस दलातर्फे तत्कालीन पोलीस अधीक्षक हरिष बैजल,अप्पर पोलीस अधीक्षक श्री. आटोळे यांचे प्रयत्नाने कु. राजुलाचे पुनर्वसन करण्यात येऊन शासनाच्या आत्मसमर्पण योजनेच्या माध्यमातून ती अगोदरची 7 वी पास असल्याने व तिला पुढे शिकण्याची इच्छा व आवड असल्याने सन 2018 मध्ये देवरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत 8 वी मध्ये प्रवेश देण्यात आला होता. पुढे गोंदिया जिल्हा पोलीस दलाचे सहकार्याने नियमित शिक्षण घेत जून 2021 मध्ये तिने 10 वीची परीक्षा 51. 80% गुण मिळवून उत्तीर्ण केली. त्याचप्रमाणे मनोहरभाई पटेल ज्यु. कॉलेज देवरी येथे शिक्षणं घेत असताना तिने 2023 मध्ये 12 वी ची परीक्षा देत तिने 46% गुण मिळवून उत्तीर्ण केली आहे.

कुमारी राजुला हिने माओवादी विचारसरणीला डावलून, हिंसाचाराचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केल्यानंतर अथक परिश्रम घेवून 10 वी, 12 वी चे शिक्षणं पुर्ण करीत घेतलेली यशस्वी भरारी कौतुकास्पद असल्याने तिचा सन्मान म्हणुन आज दिनांक  27 मे रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व श्रीमती समृद्धी पिंगळे यांचे हस्ते सत्कार करुन पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा देण्यात आल्या. सदर प्रसंगी कु. रजुला हिने आपले मनोगत व्यक्त करताना पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण करून पोलिस दलात भरती होण्याची इच्छा व्यक्त केली.पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी तिचे पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.सदर सत्कार कार्यक्रमा प्रसंगी पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, श्रीकांत हत्तीमारे , तसेच नक्षल सेल येथील पोलीस अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.