कोसमतोंडी व डवकीचे 184 विद्यार्थी मास काॅपीमूळे केमिस्ट्रीत नापास

0
7

गोंदिया- जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील फुलीचंद भगत महाविद्यालय कोसमतोंडी आणि देवरी तालुक्यातील सिदार्थ कनिष्ठ महाविद्यालया डवकीतील  १८४ विद्यार्थीना १२ वी वर्गाच्या परीक्षेत रसायनशास्त्र ( केमिस्ट्री) विषयात मास काॅपी केल्यामूळे नागपूर परीक्षा मंडळाने नापास केल्याचे समोर आले आहे.

दोन्ही शाळा या वेगवेगळ्या असल्या तरी दोन्ही महाविद्यालयातील विद्यार्थांनी सोडवलेले प्रश्नांचे उत्तर लिहिण्याची पद्धत आणि क्रमही सारखाच परिक्षकाला आढळून आला होता. सर्वांचे उत्तर सारखेच असल्याने पेपर तपासतांना परीक्षकाला कॉपी केल्याचा संशय माॅडरेटरने चिप माॅडरेटरकडे आणि त्यांनी बोर्डाकडे नोंदविला. त्यामुळे नागपूर बोर्डाने मुलांना बोलावून त्यांची तोंडी परीक्षा घेतली आणि मास कॉपीचा ठपका ठेवत सगळ्या मुलांना केमिस्ट्रीत नापास केले.
दोन्ही महाविद्यालयातील मिळून १८4 विद्यार्थ्यांची नागपूर बोर्डानं तोंडी परीक्षा घेतली. यातील फक्त एकच विद्यार्थी पास होऊ शकला. कारण एकाच मुलानं कुठलाही प्रश्न विचारा, मी त्याचं उत्तर देतो, असं आत्मविश्वासानं सांगितलं. पण केमिस्ट्रीचे फॉर्म्युले सांगताना बाकीच्या मुलांना नाकीनऊ आले.

सडक अर्जुनी तालुक्यातील फुलीचंद भगत विज्ञान महाविद्यालयातील १२ व्या वर्गात परीक्षेला बसलेले ६१ विद्यार्थी केमिस्ट्री विषयात दोन प्रश्नांचे उत्तर सारखेच लिहल्याने नागपूर बोर्डाने या ६१ विद्यार्थ्यांना केमिस्ट्री विषयात शून्य गुण दिले आहे. तर असाच प्रकार देवरी तालुक्यातील सिदार्थ कनिष्ठ महाविद्याल डवकीत देखील घडला. या शाळेतील १२३ विद्यार्थ्यांनी देखील केमिस्ट्री विषयाच्या पेपरमध्ये प्रश्नाची उत्तरे सारखीच लिहल्याने मास कॉपी कायद्या अंतर्गत त्यांना देखील नागपूर बोर्डाने नापास केले आहे. सुरवातीला या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका विथेल्डमध्ये ठेवण्यात आल्या होत्या आणि ५ परीक्षकांकडून पुन्हा तपासून घेण्यात आले. त्यावेळी काही विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिका पहिली असता, आम्हाला ४५  ते ५० गुण मिळायला हवे असा दावा केला होता. मात्र या १८४ विद्यार्थ्यांची टप्या टप्याने नागपूर बोर्डात तोंडी परीक्षा घेण्यात आली त्यात उत्तरे देताना विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. अखेर नागपूर बोर्डाने या विद्यार्थ्यांचा निकाल घोषित करत महाविद्यालय प्रशासनाला नोटीस बजावत दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांना केमिस्ट्री विषयात शून्य गुण दिले. त्यामुळे १८४ विद्यार्थी नापास झाले आहे. मात्र, प्रात्यक्षिक परीक्षेचेही मार्क कापण्यात आल्याने विद्यार्थी चागलेच संतापले आहेत, त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी कोर्टात जाण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र या विषयी शाळा महाविद्यालयांशी संपर्क केला असता त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला. आता या १८४ विद्यार्थ्यांना पुन्हा केमिस्ट्रीचा पपेर द्यावा लागणार आहे, त्यामुळे वर्षही गेल आणि वेळही अशीच परिस्थिती या विद्यार्थ्यांसोर आली आहे.