देवरी तालुक्यात शालेय प्रवेशोत्सव थाटात

0
6

फोटो- तालुक्यातील पिंडकेपार (गो) येथे जि.प. बैलबंडी सजवून नवागतांच्या स्वागतासाठी गावात मिरवणूक काढण्यात आली होती. (छाया- सुरेश भदाडे)

देवरी,(ता.28)-शाळेच्या पहिल्याच ठोक्याला तालुक्यातील सर्वच व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पहिला दिवस अर्थात शालेय प्रवेशोत्सव मोठ्या थाटात काल सोमवारी (ता.27) साजरा करण्यात आला.
शासन निर्णयाप्रमाणे, जिल्हाधिकारी गोंदिया यांनी शालेय प्रवेशोत्सव साजरा करण्यासंबंधी निर्देश शिक्षण विभागाला दिले होते. यामुळे संपूर्ण तालुक्यात तहसीलदार, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, गटविकास अधिकारी, सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, विषय साधनव्यक्ती, केंद्रप्रमुख यांनी शाळांना भेटी देऊन प्रवेशोत्सव साजरा करण्यात मोलाचे सहकार्य केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढिवरीणटोला आणि पिंडकेपार (डवकी) येथे नवागंताच्या स्वागतासाठी बैलबंडी सजवून गावात मिरवणूक काढण्यात आली. शाळेच्या पहिल्याच विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सुद्धा या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देत शालेय गणवेशात शाळेत आपली उपस्थिती नोंदविली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शालेय परिसराची संपूर्ण स्वचछता करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना यावेळी गोड जेवण देण्यात आले. हा सोहळा विस्मरणीय करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, शिक्षक आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शालेय प्रवेशोत्सव थाटात साजरा केल्यासंबंधी देवरीचे गटशिक्षणाधिकारी किशोर भांडारकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले.