गावे पुन्हा पाणीदार होण्यासाठी जलयुक्त, वनयुक्त शिवारांची गरज – मुख्यमंत्री

0
8

नागपूर, दि. 28 : राज्यातील प्रत्येक गांव पुन्हा पाणीदार
होण्यासाठी जल, जंगल आणि वाहून जाणारी माती थांबविण्यासाठी वृक्षारोपण
मोठया प्रमाणात करण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाने
वृक्षारोपणासाठी येत्या 1 जुलै रोजी पुढाकार घेऊन 2 कोटी वृक्ष लावण्याचा
निर्धार करावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हिंगणा
येथे जनतेला केले.
ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन, वनविभाग व सामाजिक वनीकरणाच्या
संयुक्त विद्यमाने प्राध्यापक आमदार अनिल सोले यांच्या नेतृत्वात 20 जून
पासून रामटेक येथून सुरु झालेल्या वृक्ष दिंडी यात्रेचा समारोप हिंगणा
येथील रेणुका सभागृहात आयोजित समारंभात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली
झाला. त्यावेळी ते बोलत होते.
या समारोप कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,
महापौर प्रवीण दटके, माजी मंत्री शोभाताई फडणवीस, माजी खासदार बनवारीलाल
पुरोहित, खासदार अजय संचेती, आमदार समीर मेघे, डॉ. आशीष देशमुख, नागो
गाणार, डॉ.मिलिंद माने, सुधाकर कोहळे, पंकज भोयर, जिल्हा परिषद अध्यक्षा
निशा सावरकर, जिल्हा भाजपा अध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, गिरीष गांधी यांची
प्रमुख उपस्थिती होती.
राज्यात येत्या तीन ते चार वर्षात 25 ते 50 कोटी वृक्ष लावण्याची गरज
आहे. यासाठी शासनाचे प्रयत्न सुरु आहे. परंतू हे केवळ शासनाचे काम नाही
तर लोकसहभागही महत्वाचा आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यात 6 हजार
गावांपैकी 4 हजार गावांमध्ये जलयुक्तची कामे पुर्ण झालेली आहे. त्याचे
दृश्य परिणाम यावर्षी आपल्याला निश्चितपणे दिसेल असा विश्वास मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
पाण्यासोबतच माती अडविण्याचे कामही अत्यंत आवश्यक आहे. माती
अडविण्याचे काम फक्त आणि फक्त वृक्षच करु शकतात. या परस्पर पुरक बाबी
आहे. म्हणूनच वृक्ष रोपणासाठी लाखो हात समोर येण्याची गरज आहे. केवळ
वृक्ष लावूनच आपल्याला थांबायचे नाही, तर ते जगविण्यासाठीही प्रयत्न
करण्याची गरज आहे. नद्या पुन्हा पुनरुजिवीत करण्याचे काम मोठया प्रमाणात
सुरु आहे. आताच मी रायपूर (हिंगणा जवळील) येथे भेट दिली. तेथील वेणा आणि
दुर्गा या नद्यातील गाळ काढल्यामुळे त्या खऱ्या अर्थाने आता नद्या
दिसायला लागल्या आहेत. हे केवळ कुण्या ऐकाचे काम नाही. तर गावकऱ्यांनी
पुढाकार घेतल्यामुळेच हे शक्य झाले. असेही मुख्यमंत्र्यांनी आवर्जुन
सांगितले.
नदी, नाले, ओढे व वृक्ष हे निर्सगाचा समतोल राखणारे प्रमुख
घटक आहेत. यांच्यामुळे पाण्याचा थेंब न थेंब जमिनीत साठविला जात होता.
परंतू काळाच्या ओघात ही साखळी तोडण्याचे काम मानवाच्या हातून झाल्यामुळे
राज्यावर अस्मानी संकट कोसळले आहे. ही साखळी परत एकदा जोडण्यासाठी
प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी जनसहभाग व जनआंदोलन व्हावे असेही,
मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
वृक्षारोपणाच्या निमित्ताने आपण परत एकदा आपल्या गावातील
रोगराई नष्ट करण्याच्या कामास सुरुवात करुया. कारण वृक्ष नसल्यामुळे अनेक
प्रजाती नष्ट झालेल्या आहेत. त्या पुन्हा पुनरुजीवीत करण्यासाठी
गावागावात वृक्षारोपण करण्याची गरज आहे. यासोबतच वृक्षतोडही थांबविणे
आवश्यक आहे. भविष्यात येणाऱ्या संकटाचा सामना करावयाचा असेल तर
वृक्षारोपणाशिवाय पर्याय नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी आ. शोभाताई फडणवीस म्हणाल्या की, आमदार अनिल सोले
यांनी वृक्ष दिंडीच्या माध्यमातून गावागावात वृक्ष लागवडीची गरज जनतेला
पटवून दिली आहे.आमदार समीर मेघे म्हणाले की, वृक्षलागवड ही काळाची
गरज असून समाजातील प्रत्येक व्यक्तिंनी 1 जुलै रोजी वृक्षारोपण मोहिमेत
सहभागी होऊन एक वृक्षाची लागवड करावी.प्रास्ताविकात आमदार अनिल सोले म्हणाले की, शासनाने
2 कोटी वृक्ष लागवडीची संकल्पना केली. त्याचे स्वागत करुन वृक्ष
दिंडीच्या माध्यमातून गावागावांत जनजागृती करुन जनतेला वृक्ष लागवडीसाठी
प्रेरीत केले आहे. या वृक्ष दिंडींत दीड ते दोन लाख गावकरी सहभागी झाले
होते.