महासमाधान शिबीर यशस्वी करा- पालकमंत्री बडोले

0
5

गोंदिया,दि.३ : महासमाधान शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला विविध योजनांचा लाभ देण्यासोबतच विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांना दैनंदिन कामासाठी लागणारी आवश्यक ती दाखले, कागदपत्रे देण्यासाठी १६ ऑगस्ट रोजी अर्जुनी/मोरगाव येथे आयोजित करण्यात येणारे महासमाधान शिबीर यशस्वी करण्यासाठी विविध यंत्रणांनी आतापासूनच कामाला लागावे. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात या शिबिराच्या आयोजनासाठी पालकमंत्री बडोले यांच्या अध्यक्षतेखाली विविध यंत्रणांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री बडोले यांनी उपरोक्त निर्देश दिले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पुलकुंडवार, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती छाया दसरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री पुढे म्हणाले, हे शिबीर अर्जुनी/मोरगाव, सडक/अर्जुनी व गोरेगाव तालुक्यातील नागरिकांसाठी आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरात जवळपास २५ ते ३० हजार विविध प्रकारचे दाखले, प्रमाणपत्रांचे वाटप, विविध विभागाचे योजनांची माहिती देणारे व उत्पादित वस्तुंचे स्टॉल, तसेच विविध लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी आतापासूनच यंत्रणांनी नियोजन करुन कामाला लागावे. या तीनही तहसिल कार्यालयात समाधान कक्ष तयार करावे. नागरिकांना व लाभार्थ्यांना विविध प्रकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत त्याची माहिती देवून लाभार्थ्यांची परिपूर्ण व आवश्यक ती कागदपत्रे गोळा करावी. विविध योजनांची माहिती गावपातळीवर लाभार्थ्याना व ग्रामस्थांना व्हावी यासाठी संबंधित विभागांनी योजनांचे पॉम्पलेटस् तयार करुन गावोगावी वितरीत करावी.
३१ जुलैपर्यंत सर्व लाभार्थ्यांचे अर्ज गावागावातून एकत्र करुन त्याची छाननी करण्यात यावी असे सांगून श्री.बडोले म्हणाले, छाननीत कमी असलेला कागदपत्रांची पूर्तता संबंधित लाभार्थ्यांकडून करुन घ्यावी. १५ जुलैपर्यंत कोणत्या विभागांकडून कोणकोणत्या योजनांचा लाभ देण्यात येणार आहे हे निश्चित करावे. गावपातळीवरील लाभार्थ्यांना अनेकदा योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे गोळा करता करता तालुक्याच्या कार्यालयास दोन चार वेळा यावे लागते, यामध्ये त्यांचा वेळ व पैसा जातो. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांना त्रास होणार नाही ही काळजी घेऊन महाशिबीरात योजनांचा लाभ देण्यात येईल. तसेच या महाशिबीराच्या उदघाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
डॉ.सूर्यवंशी म्हणाले, महाशिबीराच्या यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांची पूर्व तयारीबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल. महाशिबीरात विविध विभागाचे स्टॉल लावण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी यांची उपस्थिती होती.