कॅन्सर इन्स्टिट्यूट : औरंगाबादचा विचार

0
17

नागपूर दि.३: राज्य शासनातर्फे कॅन्सर इन्स्टिट्यूट स्थापन करण्यासाठी नागपूरला डावलून औरंगाबादचा विचार करण्यात येत आहे, असा दावा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रेडिओथेरपी विभागाचे प्रा. डॉ. कृष्णा कांबळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून केला आहे. न्यायालयाने गुरुवारी ही बाब लक्षात घेता शासनाला यावर दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्यास सांगितले.

कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता नागपुरात कॅन्सर इन्स्टिट्यूट स्थापन करण्यात यावे व एम. डी. (रेडिओथेरपी) अभ्यासक्रमाला ‘एमसीआय’ची मान्यता मिळण्यासाठी सर्व त्रुटी दूर करण्यात याव्यात अशा विनंतीसह डॉ. कांबळे यांनी दाखल केलेली जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. दरम्यान, शासनाने औरंगाबाद येथे कॅन्सर इन्स्टिट्यूट स्थापन करण्याची भूमिका घेतली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कर्करोग वेगाने वाढत आहे.

२०१२ मध्ये देशभरात ६ लाख ८२ हजार ८३० कर्करोग रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुरुषांमध्ये फुफ्फुस, तोंड, अन्न नलिका व पोटाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. कर्करोगाच्या विविध प्रमाणात नागपूर हे मुंबई, पुणे व औरंगाबादच्या तुलनेत फार पुढे आहे. यामुळे नागपुरात कॅन्सर इन्स्टिट्यूटची स्थापना करणे आवश्यक आहे, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अनिल किलोर यांनी बाजू मांडली.