‘सीबीएसई’ दहावीला व्यावसायिक अभ्यासक्रमाचा विषय

0
13

नागपूर दि. 12: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ ‘सीबीएसई’च्या दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षीपासून पाचऐवजी सहा विषयांची परीक्षा द्यावी लागणार आहे. सहावा व्यावसायिक अभ्यासक्रमाचा विषय ऐच्छिक न ठेवता अनिवार्य करण्याचा निर्णय मंडळाने घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना या विषयाचीही परीक्षा पुढील वर्षीपासून द्यावी लागणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आता नवीन परीक्षा पद्धतीला सामोरे जावे लागणार आहे.
सध्या सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन भाषा, सामाजिकशास्त्र, गणित आणि विज्ञान या पाच विषयांचीच परीक्षा द्यावी लागते. याशिवाय व्यावसायिक शिक्षणाचा अतिरिक्तविषय विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक ठेवण्यात आलेला आहे. मात्र, २0१७-१८ या शैक्षणिक सत्रापासून हा विषय अनिवार्य होणार आहे. राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्कअंतर्गत हा विषय अनिवार्य करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.
जर विद्यार्थी सामाजिकशास्त्र, गणित किंवा विज्ञान या तीनपैकी एका विषयात नापास झाला तर तो विषय व्यावसायिक विषयाने बदलता येईल, असे सीबीएसईने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. तसेच नापास विषयाची पुन्हा परीक्षा देण्याचे स्वातंत्र्यही विद्यार्थ्याला असेल, असे यात म्हटले आहे. ऐच्छिक विषय १00 गुणांचा असेल. १00 गुणांच्या या विषयातील ५0 गुणांची परीक्षा असेल. उर्वरित ५0 गुण हे अंतर्गत तसेच प्रात्यक्षिक परीक्षेसाठी असतील, असे यात म्हटले आहे.< नव्या शैक्षणिक सत्रापासून लागू होणार