जि.प. कर्मचार्‍यांचे ‘लेखणी बंद’ आंदोलन बुधवारपासून

0
15

नागपूर दि.12:आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेच्या वतीने १५ मार्चपासून ‘लेखणी बंद’ आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.शासनाला वारंवार निवेदने देऊन तसेच बैठका होऊनही मागण्यांकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे पाहून संघटनेच्या वतीने १0 मार्च ते १४ मार्चपर्यंत काळ्या फिती लावून शासनाचा निषेध करीत काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर १५ मार्चपासून लेखणी बंद आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतरही या आंदोलनाची दखल न घेतल्यास १0 एप्रिल, २0१७ पासून मंत्रालय परिसरात जि. प. लेखा कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष विजयसिंग सूर्यवंशी, राज्य महासचिव सुदाम पांगुळ यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय कार्यकारिणी साखळी आंदोलन करणार आहेत. हे आंदोलन सुरू असताना मागण्या पूर्ण न झाल्यास केव्हाही बेमुदत उपोषणाची नोटीस देऊन उपोषण सुरू करणार असल्याचे संघटनेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
ज्या दहा मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी विभागीय बैठका घेण्यात येत असून अंतिम बैठक फेब्रुवारी महिन्यात पार पडली. या बैठकीला मुख्य मार्गदर्शक आमदार सुधाकर कोहळे, संघटनेचे राज्याध्यक्ष विजयसिंग सूर्यवंशी, राज्य महासचिव सुदाम पांगुळ, राज्य कोषाध्यक्ष दीपक जोशी, औरंगाबाद विभागीय अध्यक्ष महेश कोतावार, लेखा कर्मचारी सर्वश्री सी. एच. बडवाईक, संतोष नेवारे, सुरेंद्र मदनकर, नितीन काकडे, अशोक राठोड, आनंद मडावी, नरेश भोयर, अरविंद पावडे, जयंत दंडारे, मनोज चामाटे, विजय बुर्वेवार, मुकेश शेंडे, राकेश खैरकार, आर. एल. राजेश्‍वर, प्रशांत बेदनकर, संजय साखळे, केशव ढवळे, विजय जामनेरकर, शंकर शिरसाम, नरेंद्र धनविजय, एस. भगत, एस. आगासे, सुभाष कोतेवार, किशोर खुबाळकर, महिला प्रतिनिधी सुजाता बारोकर, शुभा भांडे आदी उपस्थित होते. बैठकीचे आभारप्रदर्शन विभागीय अध्यक्ष महेश कोतावार यांनी केले.