आयसीटी योजनेचा नावीन्यपूर्ण उपयोग करणाऱ्या शिक्षकांकरिता राष्ट्रीय पारितोषिक

0
17

मुंबई दि 14:   केंद्र पुरस्कृत आयसीटी योजनेंतर्गत शिक्षकांकरिता राष्ट्रीय पारितोषिक या कार्यक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. यानुसार शिक्षणामध्ये आयसीटी योजनेचा नाविन्यपूर्ण उपयोग करणाऱ्या शिक्षकांना राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिक दिले जाणार आहे.

शिक्षकांनी शैक्षणिक अध्यापन प्रक्रियेमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी केंद्र शासनामार्फत आयसीटी पुरस्कार (National ICT Award for School Teachers) सुरु करण्यात आला आहे. आयसीटी योजनेचा नावीन्यपूर्ण उपयोग करणाऱ्या शिक्षकांकरिता राष्ट्रीय पारितोषिक देण्यासाठी ‍शिक्षकांची पात्रता/निवडीकरिता केंद्र शासनाकडून मार्गदर्शक तत्वे ठरविण्यात आली आहेत. या पारितोषिकासाठी निवड करण्यात येणारे शिक्षक प्राथमिक, उच्च माध्यमिक कोणत्याही मान्यता प्राप्त शाळेमध्ये कार्यरत असणे आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार राज्यातील शिक्षकांची आयसीटी पुरस्कारासाठी नामांकने पाठविणे आवश्यक आहे. राज्य शासनामार्फत राज्य शासनाच्या शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खाजगी अनुदानित शाळा (राज्य मंडळाशी संलग्न शाळा) येथूनच शिक्षकांचे नामनिर्देशन करता येणार आहे. केंद्र शासनामार्फत महाराष्ट्रासाठी 3 आयसीटी पुरस्कार निश्चित केले असून त्यासाठी राज्य शासनामार्फत जास्तीत जास्त 6 शिक्षकांची नामांकने आयसीटी पुरस्कारासाठी पाठविण्यात येतील.

प्रत्येक पारितोषिक विजेत्या शिक्षकाला आयसीटी किट, एक लॅपटॉप आणि एक प्रशंसा प्रमाणपत्र दिले जाणार आहे. पारितोषिक विजते शिक्षक यांनी मार्गदर्शक म्हणून त्यांच्या भागातील इतर शिक्षकांना प्रशिक्षित करावे आणि त्यांना प्रोत्साहित करणे अपेक्षित आहे. सर्व पारितोषिक विजेत्या शिक्षकांचा केंद्र शासनामार्फत एक समूह करुन निवडण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण बाबी इतर राज्यांना देण्यात येईल.

सदर पारितोषिकासाठी निवड करण्याकरिता शाळांनी सविस्तर प्रस्ताव विहित नमुन्यात सर्व आवश्यक त्या कागदपत्रांसह शिक्षण अधिकाऱ्यांमार्फत शिक्षण संचालक (प्राथमिक/माध्यमिक) यांच्याकडे पाठविणे आवश्यक आहे. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव/सचिव यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समितीच्या मदतीने प्राप्त  शिक्षकांच्या प्रस्तावाची शिक्षण संचालक (प्राथमिक/माध्यमिक) यांनी तपासणी करुन त्यातून निवड केलेल्या शिक्षकांचे प्रस्ताव नवी दिल्ली येथील केंद्रीय तंत्र शिक्षण संस्थेचे सहसंचालक यांच्याकडे पाठवावेत. पारितोषिकासाठीचे प्रस्ताव 31 ऑगस्ट पर्यंत केंद्र शासनाकडे पोहोचणे आवश्यक आहे त्यामुळे संबंधित शाळा/शिक्षकांनी त्यांचे नामनिर्देशन 31 जुलै 2017 पर्यंत शिक्षण संचालकांकडे सादर करणे आवश्यक आहे. शाळा किंवा शिक्षकांना परस्पर नामनिर्देशन प्रस्ताव पाठविता येणार नाहीत. राज्यातून आयसीटी शिक्षक पुरस्काराकरिता नामनिर्देशन करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव/सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.शिक्षण आयुक्त, माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक, प्राथमिक शिक्षण संचालक, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक, आयटी क्षेत्रातील दोन नामांकित तज्ज्ञ हे या समितीमध्ये सदस्य असतील. तर माध्यमिक आणि उच्च माध्यमीक शिक्षण संचालक हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.

सन 2017 च्या राष्ट्रीय आयसीटी पुरस्काराकरिता शिक्षकांचे नामनिर्देशन करण्याकरिता :-

  • शिक्षकांनी आपला पोर्टफोलिओ प्रवेश अर्जासह सादर करावा.
  • सदर पोर्टफोलिओ मध्ये आयसीटीचा वापर करुन शिक्षकाने त्याचा व्यावसायिक विकास कसा केला, त्याची अध्यापन अध्ययन कौशल्य कशी विकसित केली आणि एकूण शाळेतील आणि समूहातील शैक्षणिक गुणवत्ता कशी वृध्दीगंत केली या पुराव्याचा समावेश करावा.
  • पोटफोलिओमध्ये संबंधित सहायक कागदपत्रे, साहित्य, उपक्रमाचे अहवाल, क्षेत्रीय भेटी, फोटोग्राफ, द्रुकश्रवण साहित्य यांचा समावेश असावा.