नवोदयसाठी भंडारा जिल्हा प्रतिक्षेत

0
33

भंडारा- भंडारा च्या विभाजानानंतर एकमेव नवोदय विद्यालय गोंदियात गेल्यामुळे मागील १५ वर्षांपासून भंडारा जिल्हा या विद्यालयापासून वंचित आहे. मागील १५ वर्षापासूनच्या मागणीकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या नवोदय विद्यालयाची स्थापना देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक विद्यालय यानुसार झाली. ही निवासी शाळा गुणवंत व गरीब विद्यार्थ्यांना उच्च व शहरातील नामवंत शाळेच्या तोडीचे शिक्षण देण्यासाठी अस्तित्वात आणण्यात आली. सद्यस्थितीला भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यासाठी एकच नवोदय विद्यालय असल्याने विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे. भंडारा जिल्ह्यातील एकमेव नवोदय विद्यालय गोंदिया येथील नवेगावबांध येथे समाविष्ट झाले आहे.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी १९८६ ला प्रायोगीक तत्वावर जवाहर नवोदय विद्यालय महाराष्ट्राच्या अमरावती येथे व दुसरी राजस्थानच्या झंझर येथे सुरु केली होती.या यशस्वी प्रयोगानंतर भारताच्या सर्व राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला एक नवोदय विद्यालय स्थापन करण्याचे लक्ष्य भारत सरकारच्या मानव विकास विभागाद्वारे ठेवण्यात आले.
यात तामीळनाडू हे एकच असे राज्य आहे की त्यात नवोदयाच्या शाळा उघडण्यास तेथील राज्य सरकारने विरोध केला.त्याला कारणही तसेच होते.
भंडारा जिल्ह्याकरिता साकोली येथे नवोदय विद्यालय देण्यात आले. येथे चार पाच वर्षे ही विद्यालय सुरळीत सुरु होती.मात्र मालकीची जागा नसल्याने शासनाने ही नवोदय विद्यालय नवेगावबांध येथे हलविली. त्यावेळी भंडारा व गोंदिया ही दोन्ही जिल्हे एकत्र होती.
मात्र १९९९ मध्ये जिल्ह्याची फाळणी झाली व ही नवोदय विद्यालय गोंदिया जिल्ह्यात त्यामुळे या नवोदय विद्यालयात भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे.
ज्या विद्यार्थ्यांना या नवोदय विद्यालयात शिक्षण घ्यावयाचे असेल त्या विद्यार्थ्यांना शासनातर्फे आयोजित प्रवेश पूर्ण परीक्षा द्यावी लागते.
यात परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. ही परीक्षा दरवर्षी वर्षातून एकदाच घेतली जाऊन परीक्षा नि:शुल्क असते.