सुकर्माचा उचला विडा; मग हक्कासाठी लढा – मुबारक सय्यद

0
26

गोरेगाव,दि.12- आदिवासी, दुर्गम व वंचित घटकांतील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, प्रत्येक मूल प्रगत व्हावे यास्तव महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षणात विविध प्रयोग करत आहे. दर्जेदार शिक्षण देवून जि प च्या शाळा, विद्यार्थी व शिक्षक टिकावेत यासाठी अतोनात पैसा खर्च होत आहे; परंतु विद्यार्थी व गुणवत्तेत आमुलाग्र परिवर्तन दिसत नाही.करिता उपस्थित शिक्षक बंधूभगिनींनो आधी सुकर्माचा उचला विडा; मग न्याय व हक्कासाठी लढा असा समयोचित नारा शाळासिद्धी प्रकल्पाचे राज्य निर्धारक व जि प खराशी शाळेचे मुख्याध्यापक मुबारक सय्यद यांनी दिला.ते ११ अॉगष्टला गोरेगाव तालुक्यातील मोहगाव(तिल्ली) व कु-हाडी केंद्रांच्यावतीने संयुक्त कार्यप्रेरणा परिषदेचे आयोजन गुरूकृपा लॉन्स गोरेगाव येथे करण्यात आले होते.त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी पं स गोरेगावचे गटसमन्वयक एस बी खोब्रागड़े तर प्रमुख अतिथी म्हणून सर्व शिक्षा अभियान गोंदियाचे जिल्हासमन्वयक बालकृष्ण बिसेन, मोहगाव(ति)चे केंद्रप्रमुख आर आर अगडे, केंद्र कु-हाडीचे केंद्रप्रमुख एच एस शहारे उपस्थित होते.
शाळासिद्धी प्रकल्पाविषयी विविध मुद्देसुद माहिती, शासनाची अपेक्षा, तीन वर्षांची मुदत, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या शाळासिद्धीविषयी अपेक्षा, असर अहवाल तथा सातत्याने निघणाऱ्या विविध आदेशांची मूळ भावना समजून-उमजून घेण्यासाठी अपडेट राहणे गरजेचे आहे आसे यावेळी ते म्हणाले.भंडारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी महोदयांनी जिल्ह्यातील एकूण ११५ शाळांची निवड करून मानव विकास मिशन निधी उपलब्ध करून देणार व संपूर्ण जिल्ह्यात खराशी पॅटर्न राबविणार असल्याचे सांगितले.गोंदिया जिल्ह्याची राज्यस्तरावर नेहमी वेगवेगळ्या रूपानं चर्चा व नेतृत्व असते असे यावेळी सय्यद यांनी म्हटले, त्यांचे प्रतिनिधी व जिल्हासमन्वयक बालकृष्ण बिसेन यांनी ‘प्रतिभा विकास दिन’ व दप्तर विरहीत शाळेविषयी विस्तृतपणे माहिती दिली.केंद्रप्रमुख आर आर अगडे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज दौऱ्याविषयी विस्तृतपणे माहिती दिली तसेच नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विशेष शिबीराचे आयोजन मासिकवार करणार असल्याचे सांगितले.केंद्रप्रमुख एच एस शहारे यांनी आगामी प्रगत चाचण्या व नवीन निकषांची इत्थंभूत माहिती दिली तर गटसमन्वयक एस बी खोब्रागड़े यांनी आपले कसब व कौशल्ये पणास लावून सर्व शाळा *अ* श्रेणीत आणण्याचे सर्व शिक्षकांना आवाहन केले.दरम्यान सय्यद यांचा स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक केंद्रप्रमुख आर आर अगडे यांनी तर सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन केंद्रप्रमुख एच एस शहारे यांनी केले. यावेळी दोन्हीही केंद्रातील सर्व व्यवस्थापनाचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.