शिक्षकांना ‘टीईटी’च्या तीनच संधी,उत्तीर्ण न झाल्यास सेवा समाप्त

0
13

गोंदिया,दि.26 – राज्यातील सर्व शासकीय आश्रमशाळा, अनुदानीत आश्रमशाळा, केंद्रीय आश्रमशाळा व एकलव्य रेसिडेशियल स्कूल या शाळांमध्ये नियुक्त झालेल्या शिक्षकांना यापुढे शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होण्यास केवळ तीन संधी मिळणार अाहेत. या मुदतीत जे शिक्षक उत्तीर्ण होणार नाहीत, त्यांच्या राज्य सरकारकडील सर्व सेवा समाप्त करण्यात येणार आहेत, असा शासन निर्णय राज्याच्या आदिवासी विभागाने सोमवारी जारी केला आहे.

आदिवासी विभागाकडील शाळांमध्ये केवळ टीईटी उत्तीर्ण उमेदवारांना नेमण्यात यावे. जर टीईटी उत्तीर्ण उमेदवार प्राप्त झाला नाही तर इतर उमेदवारांना त्या वर्षीचे सत्र समाप्तीपर्यंत कंत्राटी नियुक्ती देण्यात यावी. या कंत्राटी शिक्षकांना कोणतेही आर्थिक अनुदान मिळणार नाही तसेच त्यांना कोणतेही सेवाविषयक लाभ मिळणार नाहीत, कंत्राटी नियुक्तीवरील सेवकांचा खर्च संबंधित संस्थेने करावयाचा आहे, असे आदिवासी विभागाने बजावले आहे.
 प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्तीवेळी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असावा याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. २०१३ नंतर जे शिक्षक नियुक्त झाले आहेत, मात्र त्यांनी टीईटी परिक्षा उत्तीर्ण केलेली नाही, त्यांना आता तीन संधीत परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. पुढच्या तीन परिक्षा त्यांच्या तीन संधी समजण्यात येतील. या परीक्षांना बसण्याची सर्वस्वी जबाबदारी उमेदवारांची आहे. जे तीन संधीत उत्तीर्ण होणार नाहीत, त्यांच्या सर्व सेवा समाप्त करण्यात येतील, असे आदिवासी विभागाने स्पष्ट केले आहे. २०११ च्या अधिसूचनेनुसार शिक्षकांकरिता शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) अनिवार्य केली आहे. १ ते ८ वी पर्यंत शिकवण्यासाठी टीईटी पात्र असणे आवश्यक आहे. २०१३ पासून प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्तीकरता टीईटी परिक्षा अनिवार्य केली आहे.