अनुदानासाठी शिक्षकांचा एल्गार,१३ नोव्हेंबरपासून राज्यभर करणार बेमुदत आंदोलन

0
15

मुंबई,दि.06 : शिक्षक विद्यादानाचे काम करत असूनही सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. राज्यातील विनाअनुदानित शाळा गेल्या १७ वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. वेळोवेळी सरकार दरबारी दाद मागूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शिक्षकांनी १३ नोव्हेंबरपासून राज्यभर बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाचा प्रश्न १७ वर्षांत सुटलेला नाही. अनुदानाच्या प्रश्नासंदर्भात गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनात मार्ग मोकळा झाला होता. मात्र त्यानंतरही अद्याप हा प्रश्न कायम आहे. या अनुदानाच्या प्रश्नाबाबत सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी राज्य विनाअनुदानित कृती समितीतर्फे मुंबईसह राज्यातील शिक्षण उपसंचालक कार्यालयावर १३ नोव्हेंबर रोजी आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेने जाहीर केले आहे. संघटनेतर्फे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे. मुंबईत आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तर त्याचप्रमाणे राज्यातील ७ शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेने प्रदेशाध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी सांगितले.
अनुदानाच्या प्रश्नाबरोबर १, २ जुलै २०१६ रोजी आदेशित शाळांना त्वरित प्रचलित नियमानुसार निधी मंजूर करून 100 टक्के अनुदान देण्यात यावे. शिक्षण क्षेत्रात असंतोष निर्माण करणार्या शिक्षण सचिव व अधिकार्यांना तत्काळ हटवावे, अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा वर्ग तुकड्या या निधीसह घोषित करा, २० टक्के अनुदान घेत असलेल्या १ हजार ६२८ शाळांना व वर्ग तुकड्यांना प्रचलित नियमानुसार ताबडतोब अनुदान देण्यात यावे, ४ आॅक्टोबर २०१६ च्या आंदोलकांवरील सर्व गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत यासारख्या अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे राज्य अध्यक्ष तात्यासाहेब म्हसकर यांनी जाहीर केले.