राजन वेळूकर कुलगुरूपद सोडा, राज्यपालांचे आदेश

0
15

मुंबई- विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर यांना आज जोरदार धक्का बसला. राजन वेळुकर यांनी कुलगुरूपदावरून दूर व्हावे असे आदेशच राज्याचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी दिले आहे. त्यांच्या जागी उपकुलगुरू नरेश चंद्र यांना तात्पुरता पदभार स्वीकारावे असे आदेशही राज्यपालांनी दिले आहेत.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर यांची कारकीर्द सतत वादग्रस्त राहिलीय. राजकीय वशिल्यानं त्यांची नियुक्ती झाली, असा गंभीर आरोप त्यांच्यावर झाला. एवढंच नाहीतर वेळूकरांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी शंका निर्माण झाल्या. दोन महिन्यांपूर्वीच राजन वेळूक कुलगुरूपदासाठी अपात्र आहे असा निष्कर्ष मुंबई हायकोर्टाने नमूद केला होता. मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू ए. डी. सावंत यांनी राजन वेळूकर यांच्या निवडी संबंधीत एक याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली. कुलगुरूपदासाठी राजन वेळूकर यांनी कोणताही शोध-प्रबंध सादर केलेले नाही. कोणत्याही विषयावर त्यांनी संशोधन केलं नाही. त्यामुळे अशी व्यक्ती कुलगुरूपदावर नियमानुसार बसू शकत नाही. राजन वेळूकर यांनी निवडीच्या वेळी खोटी माहिती दिला. प्राध्यापक नसतानाही वेळूकरांची कुलगुरू म्हणून नेमणूक करण्यात आली, असा आक्षेप या याचिकेत घेण्यात आलाय. यावर कोर्टाने राजन वेळूकर कुलगुरूपदासाठी अपात्र आहे असा निष्कर्ष काढला होता. तसंच सावंत यांनी याअगोदरही राज्यपालांकडे याबाबत पत्र लिहून तक्रार केली होती. आता राज्यपालांनी याची दखल घेऊन वेळूकर यांनी खुर्ची सोडावी असा आदेश दिला. त्यामुळे इतक्या दिवसांपासून कुलगुरूपदाबाबत अडून बसणारे राजन वेळूकर काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं.