प्राथमिक शिक्षकांच्या पदोन्नत्या न केल्यास शिक्षक संघ आंदोलन करणार

0
9

सांगली,दि.17ः- जिल्हा परिषदेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून विषय शिक्षक,मुख्याध्यापक,केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी या पदांसाठी प्राथमिक शिक्षकांच्या पदोन्नत्या करण्यात आलेल्या नाहीत. परिणामी अनेक शाळा, केंद्र व तालुक्यांमध्ये सदरची पदे वर्षानुवर्ष रिक्तच राहिल्यामुळे विद्यार्थी गुणवत्तेचा प्रश्‍न निर्माण होत आहे. पदोन्नत्या नसल्यामुळे अनेक प्राथमिक शिक्षकांवर पदोन्नती विना सेवानिवृत्त होण्याची वेळ आल्यामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.सदर पदोन्नतीचा निर्णय हा जिल्हा परिषद प्रशासनाच्या अधिकारात असल्याने यावर तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा डिसेंबर मध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून प्राथमिक शिक्षक संघाने दिला आहे.

पदोन्नत्या केल्या तर सर्व रिक्त जागा भरल्या जातील व गुणवत्तेचा प्रश्न निर्माण होणार नाही, शिक्षकांचे आर्थिक नुकसान टळेल. तसेच जिल्हांतर्गत बदल्या मध्ये गैरसोय झालेल्या शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ घेऊन काही अंशी सोयीच्या ठिकाणी येण्याची संधी शिक्षकांना मिळण्याची संधी निर्माण होणार असल्याचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले.त्यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुकुंद सूर्यवंशी, कोषाध्यक्ष अमोल माने उपस्थित होते.यावर महिन्याभरात पदोन्नती करणार असे आश्‍वासन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी संघाच्या शिष्टमंडळाला दिले.