बीडीओंनी घेतला परिपाठ, प्रतिज्ञा

0
14

गोंदिया-शिक्षक संघटनांच्या मागणीवरून जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळपाळीत भरविण्यात येत आहेत. आज, मंगळवारी गटशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी यांनी तालुक्यातील कसारीटोला, गर्राखुर्द शाळेला भेट दिली. तब्बल साडेआठ वाजतापर्यंत सातपैकी एकही शिक्षक शाळेत हजर नव्हते. अचानक दिलेल्या भेटीत हा प्रकार उघडकीस आला. मोहबंशी यांनी स्वतः विद्याथ्र्यांचा शालेय परिपाठ आणि प्रतिज्ञा घेतली. शाळेतील शिक्षकांना कारणे दाखवा नोटिस बजावली.
जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढावी, विद्यार्थी आकर्षित व्हावे, याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येतात. जिल्हा परिषदेने पुढाकार घेत ‘गावची शाळा, आमची शाळाङ्क हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाच्या माध्यमातून काही शाळांतील गुणवत्ता वाढण्यास सुरवात झाली. सध्या उन्हाचा कडाका असल्यामुळे शाळा सकाळपाळीत भरविण्यात याव्यात, अशी मागणी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेकडे केली. मागणीला अनुसरून १६ मार्च पासून शाळा सकाळपाळीत भरविण्यात येत आहेत. शिक्षक वेळेवर येतात काय याची चौकशी करण्याकरिता गटशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी यांनी आज, मंगळवारी सकाळी आठ वाजता कसारीटोला, गर्राखुर्द या शाळेला भेट दिली. ही शाळा सात शिक्षकी असून येथे १५७ विद्यार्थी दाखल आहेत. साडेआठ वाजतापर्यंत एकही शिक्षक शाळेत पोहोचले नाही. त्यामुळे खुद्द गटशिक्षणाधिकारी मोहबंशी यांनी विद्याथ्र्यांना एकत्रीत करून शालेय परिपाठ आणि प्रतिज्ञा घेतली. मुख्याध्यापक आणि शिक्षकांना याबाबत कारणे दाखवा नोटिस बजावली. या घटनेवरून जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची अवस्था कशी आहे, शिक्षणाचा दर्जा कसा असेल, अशी चर्चा रंगू लागली. उल्लेखनीय म्हणजे, शिक्षक संघटना शासन शिक्षकांवर अन्याय करत असल्याचे सांगतात. परंतु, स्वतः कार्यात कसूर करत असल्याचे यानिमित्ताने पुढे आले.