मुलींच्या शिक्षणासाठी पालकांमध्ये शैक्षणिक जनजागृतीची गरज !

0
16

सांगली,दि.21ः- शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या बामणी येथे असलेल्या शाळेत गुणवत्ता पुर्ण मुलीचे शिक्षण या विषयावर दिनांक 19 जानेवारीला पहिले ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बामणी गावच्या कन्या आणि शाळेच्या माजी विद्यार्थी पत्रकार पूनम कुलकर्णी उपस्थित राहिल्या होत्या.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पूनम कुलकर्णी म्हणाल्या, शालेय जीवनात अभ्यासाबरोबरच खेळाला देखील महत्त्व देणे गरजेचे झाले आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे हल्ली मैदानी खेळ कमी झाले असून मुले लहान वयातच मोबाईलवर गेम खेळायला सुरुवात करतात. आज बामणी शाळेचे विद्यार्थी जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर खेळ खेळून बक्षीस मिळवित आहेत याचा शाळेची माजी विद्यार्थी म्हणून मला निश्चितच अभिमान आहे.

त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्यांने शालेय जीवनात आपल्या आगामी शैक्षणिक तसेच भविष्याच्या दृष्टीने ध्येय निश्चिती करणे गरजेचे आहे. पुढचा विचार न करता केवळ शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी समाजात बेरोजगार आहेत. त्यामुळे नियोजन अत्यंत महत्वाचे असल्याचेही त्या म्हणाल्या. तसेच ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर मुंबई शहरात शिक्षण घेताना तसेच पुढे नोकरी करताना आलेली विविध अनुभव त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांसमोर मांडले.

मुलींचे शिक्षण ही काळाची गरज असून मुलींच्या पालकांनी पुढाकार घेऊन मुलींना शिक्षण देणे गरजेचे आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या नगण्य आहे. ग्रामीण भागातील पालकांमध्ये शिक्षणासंदर्भात जनजागृतीची गरज आहे. आई वडिलांच्या नंतर शिक्षक हे विद्यार्थ्यांचे गुरू असतात त्यामुळे शिक्षकांचा नेहमी आदर करा असेही त्या यावेळी म्हणाल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता मोरे यांच्या हस्ते पूनम कुलकर्णी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी संगीता मोरे यांनी मुलींच्या शिक्षणासंदर्भात आपले मत मांडले. शालेय जीवनात अभ्यासाचे नियोजन, खेळ, आणि भविष्यात करिअर विषय आत्तापासून सजग राहा असा सल्ला त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.सदर कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता मोरे, शिक्षिका प्रियंका जगताप,शिक्षक जगन्नाथ कोरे, अविनाश कुंभार, हसन अत्तर, शकील तांबोळी आदी शिक्षक उपस्थित होते.