बारावीचा निकाल जाहीर, कोकण विभाग राज्यात तर गोंदिया जिल्हा नागपूर विभागात अव्वल

0
18

नागपूर/गोंदिया – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. राज्यातील एकूणच निकालाची टक्केवारी 85 टक्के आहे. त्यामध्ये मुलींचा सरासरी आकडा 90.25 टक्के आणि मुलांचा आकडा 82.40 टक्के आहे. विभागानिहाय आकडेवारी पाहिल्यास कोकण यात अव्वल स्थानी आहे. तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.मागील वर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाचा निकाल ५.०६ टक्क्यांनी घटला असून राज्यातील स्थानदेखील घसरले आहे. यंदा विभागाची आठव्या स्थानावरुन अखेरच्या स्थानावर घसरण झाली आहे. संपूर्ण विभागाच्या निकालाची आकडेवारी ८२.५१ टक्के इतकी आहे.तर नागपूर विभागात गोंदिया जिल्ह्याने आघाडी घेतली आहे.विशेष म्हणजे, राज्यातील जवळपास 4500 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना 90 टक्क्यांपेक्षा अधिक मार्क मिळाले आहेत.
नागपूर विभागात नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली असून उत्तीर्णांमध्येदेखील विद्यार्थिनींचेच प्रमाण जास्त आहे. विभागातून ७७ हजार १३८ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली व त्यातील ६६ हजार ५८६ उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८६.३२ टक्के इतकी आहे. तर विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ७८.८९ टक्के इतके आहे. सोमवारी दुपारी १ वाजता नागपूर विभागाचे निकाल जाहीर करण्यात आले. नागपूर विभागीय मंडळाचे प्रभारी अध्यक्ष देशपांडे रविकांत देशपांडे यांनी निकालाची घोषणा केली. नागपूर विभागात एकूण १ लाख ५८ हजार ३१९ पैकी १ लाख ३० हजार ६३२ परीक्षार्थ्यांनी यश संपादित केले.

विभागनिहाय असा आहे निकाल
– औरंगाबाद 87.29%
– नाशिक 84.77%
– लातूर 86.08%
– अमरावती 87.55%
– मुंबई 83.85%
– पुणे 87.88%
– नागपूर 82.51%
– कोल्हापूर 87.1%
– कोकण 93.23%

नागपूर विभागात गोंदिया जिल्हा ‘टॉप’
नागपूर विभागात यंदा गोंदिया जिल्ह्यातील उत्तीर्णांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. गोंदिया जिल्ह्यातून १९ हजार ८४१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १७ हजार ४४७ म्हणजेच ८७.९९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नागपूर जिल्ह्यातून ६२ हजार ३३३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली व यातील ५२ हजार ५२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी ८४.३२ टक्के इतकी आहे. विभागात उत्तीर्णांची सर्वात कमी टक्केवारी गडचिरोली जिल्ह्याची आहे. तेथे १२ हजार ९०१ पैकी ८ हजार ८७३ म्हणजे ६८.८० टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले.
जिल्हानिहाय उत्तीर्णांची टक्केवारी
जिल्हा                            निकाल टक्केवारी (२०१९)                        निकाल टक्केवारी (२०१८)
भंडारा                                        ८४.५३ %                                           ८८.७३ %
चंद्रपूर                                      ८०.८९ %                                            ८६.८२ %
नागपूर                                       ८४.३२ %                                         ८९.७२ %
वर्धा                                          ८०.५२ %                                          ८२.६८ %
गडचिरोली                                ६८.८० %                                          ८०.९८ %
गोंदिया                                    ८७.९९ %                                           ८९.३६ %

नियमित विद्यार्थ्यांची विभागीय आकडेवारी
अभ्यासक्रम परीक्षार्थी उत्तीर्ण टक्केवारी
विज्ञान ६८,३४१ ६१,०९८ ८९.४४
कला ६०,४९४ ४४,४९५ ७३.६१
वाणिज्य २१,९१७ १९,००९ ८६.७९
एमसीव्हीसी ७,६७५ ६,०३० ७८.७०
एकूण १,५८,३१९ १,३०,६३२ ८२.५१