ओबीसी विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना लागू

0
158

पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना लागू

चंद्रपूर- राज्य शासनाने इयत्ता 1ली ते 10वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या ओबीसी विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना लागू केली आहे. यामुळे ओबीसी प्रवर्गातील गरीब विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

इतर मागास प्रवर्गातील गरीब कुटुंबातील अनेक मुलांना त्यांच्या पालकांच्या पारंपारिक व्यवसायामध्ये मदत करावी लागत होती. त्यामुळे या कुटुंबातील मुले शाळेत नियमित जाऊ शकत नव्हती. केंद्र सरकाने ओबीसी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी 1998-99 पासून मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना सुरू केली होती. या योजनेची सुरवात राज्यात करण्याची बाब सरकारच्या विचाराधीन होती. 

आता इयत्ता 1 ली ते 10वीमध्ये शिकत असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना राज्य सरकारने चालू शैक्षणिक सत्रापासून लागू केली आहे. या योजनेंतर्गत आनिवासी इयत्ता 1ली ते 10वी च्या विद्यार्थ्यांना 10 महिन्यासाठी प्रती माह 100 रुपये तर निवासी इयत्ता 3रीचे 10वीच्या विद्यार्थ्यांना प्रती माह 10 महिन्यासाठी 500 रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. तसेच तदर्थ अनुदान म्हणून वार्षिक 500 रुपये निवासी व अनिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून देण्यात येणार आहे. या योजनेसाठी केंद्र शासन 50 टक्के  व राज्यशासन 50 टक्के निधी देणार आहे. ही योजना लागू करावी अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने राज्यशासनाकडे रेटून धरली होती. ही मागणी मान्य झाली आहे.

ही पात्रता हवी

विद्यार्थ्यांच्या पालकांची उत्पन्न मर्यादा वार्षिक 2.50 लाख रुपये असावी. या योजनेचा लाभ शासनाच्या मान्यता प्राप्त शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असेल. तसेच विद्यार्थ्यांची किमान 60 टक्के उपस्थिती अनिवार्य राहील.