विज्ञान, गणित विषय आश्रमशाळेत इंग्रजीतून शिकविणार

0
16

गोंदिया,दि.१५ : सामाजिक न्याय विभागांतर्गत चालविण्यात येत असलेल्या विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग अंतर्गत आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेबाबत न्यूनगंड निर्माण होऊ नये. तसेच भविष्यात इंग्रजी भाषेबाबत अडचणी निर्माण होऊ नये, या दृष्टीने पाचवी ते सातवीमधील विद्यार्थ्यांना ऐच्छिक स्वरूपात गणित व विज्ञान हे विषय इंग्रजी माध्यमातून शिकविण्यास शासनाने परवानगी दिली असून तसा आदेश निर्गमित केला आहे. .

विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग या घटकातील मुले शाळाबाह्य होऊ नये, यासाठी शासनाने दुर्गम भागामध्ये आश्रमशाळांची स्थापना करण्यात आली आहे. या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमातील शिक्षण मिळत नव्हते. त्यामुळे या विभागाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेकडून आश्रमशाळेतील इयत्ता पाचवी ते सातवी या वर्गात सेमी इंग्रजी माध्यम सुरू करण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती. या मागणीच्या अनुषंगाने विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याबाबतचा शासन निर्णय १ जुलै २०१९ रोजी पारित करण्यात आला आहे. राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीमधील विद्यार्थ्यांना निवासी शिक्षणाचा फायदा मिळावा आणि त्यांची सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक प्रगती व्हावी, या उद्देशाने वर्ष १९५३-५४ पासून राज्यात आश्रमशाळा ही योजना शासनाने अमलात आणली आहे. सध्या राज्यात ५२६ प्राथमिक व २९६ माध्यमिक आश्रमशाळा कार्यरत आहेत. विजाभज आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी या भाषेबाबत भविष्यात अडचणी निर्माण होऊ नयेत यादृष्टीने आश्रमशाळांमध्ये इयत्ता पाचवी ते सातवीच्या वर्गांना इंग्रजी माध्यम सुरू करण्यात शासनाने काही अटीनुसार परवानगी दिली आहे. ज्या आश्रमशाळांना सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबण्याची असेल, त्या शाळेतील इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंतच्या मंजूर शिक्षकांपैकी किमान एक शिक्षक इंग्रजी माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील पदवीधर किंवा त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेले असणे आवश्यक आहे..