महिला कर्मचारी नसल्याने १00 हून अधिक विद्यार्थिनींनी सोडली शाळा

0
16

सिरोंचा,दि.21ः- गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुकास्थळ.परंतु याठिकाणी असलेल्या अनेक समस्यांकडे लक्ष द्यायला कुणीच तयार नाही.त्यातच येथील शासकीय अनु. जाती (नवबौद्ध) मुलींच्या निवासी शाळेत महिला अधीक्षक, महिला कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात न आल्याने संतप्त झालेल्या १00 हून अधिक विद्यार्थिंनींनी शाळा सोडल्याचा प्रकार काल शनिवारी सिरोंचा येथे घडल्याने सरकारच्या कार्याची पोलखोलच झाली.या प्रकारामुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
सिरोंचा तालुका मुख्यालयी सन २0१३ मध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारा अनुसूचित जाती (नवबौद्ध) विद्यार्थिनींसाठी शासकीय अनु. जाती (नवबौद्ध) मुलींची निवासी शाळा सुरू करण्यात आली. या शाळेत १७८ विद्यार्थिंनी शिक्षण घेत होत्या. मात्र, शाळेच्या प्रारंभापासून शाळेत महिला अधीक्षक व महिला कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली नव्हती. त्यामुळे विद्यार्थिनींच्या आरोग्याच्या समस्यासोबतच अन्य समस्या जाणून घेण्यासाठी कोणीच महिला कर्मचारी नव्हते. त्यामुळे विद्यार्थिनींनी दहा दिवसांपूर्वी शाळेत महिला अधीक्षक व महिला कर्मचारी नियुक्ती करण्यात यावी, अन्यथा सामूहिकरित्या शाळा सोडण्यात येईल, असा इशारा आयुक्तांकडे पाठविलेल्या पत्रातून दिला होता. परंतु संबंधित विभागाने १0 दिवसांचा कालावधी पूर्ण होऊन शाळेत महिला अधीक्षक व महिला कर्मचार्‍यांची नियुक्ती केली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थिनींनी आपल्या पाल्यांना बोलावून शाळा सोडली. काही विद्यार्थिनींनीचे पालक न आल्याने त्या रविवारी शाळा सोडणार असल्याची माहिती आहे.