चांदपूर जलाशयाचे पाणी सोडा- धनेंद्र तुरकर

0
13

भंडारा,दि.21ः-धान पिक जिवंत ठेवण्याकरिता चांदपूर जलाशयाचे पाणी सोडण्यात यावे, अशी लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना जि. प. सभापती धनेंद्र तुरकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. तुमसर तालुका तसेच जिल्ह्यात पावसाने १५ दिवसापासून दडी मारल्यामुळे धानाचे पर्‍हे व रोवणी पावसाअभावी करपण्यास सुरूवात झाली आहे. मागील तीन वर्षापासून अवर्षणास तोंड देत असलेला तालुक्यातील चांदपूर जलाशय लाभक्षेत्रामधील शेतकरी अस्मानी संकटामुळे भेदरलेल्या परिस्थितीत आहे. दुबार पेरणीचा कालावधी निघून गेल्यामुळे यावर्षीही दुष्काळास सामोरे जाण्याचा धोका निश्‍चित आहे. या परिस्थितीत शेतकर्‍यांना सावरण्यासाठी चांदपूर जलाशयाचे पाणी दोन्ही कालव्याद्वारे सिंचनाकरिता तातडीने उपलब्ध करून दिल्यास धान पिक जिवंत ठेवण्यास मदत होईल. तसेच काही अंशी झालेल्या लागवडीसदेखील जीवदान मिळेल. त्यामुळे संबंधीत यंत्रणेस चांदपूर जलाशयाचे पाणी सोडण्याचे निर्देश देऊन लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी तुरकर यांनी केली आहे.