सातारा सैनिक शाळा प्रवेश प्रक्रिया सुरु;२३ सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले

0
54

वाशिम, दि. 20 : सातारा येथील सैनिक शाळेमध्ये सन २०२०-२१ च्या सत्रातील इयत्ता ६ वी आणि इयत्ता ९ वीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रवेशासाठी लेखी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असून पात्र मुलांनी २३ सप्टेंबर २०१९ पर्यंत आपले ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी sainikschooladmission.in अथवा www.sainiksatara.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी, आजी-माजी सैनिकांच्या मुलांसाठी ४०० रुपये तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुलांना २५० रुपये परीक्षा शुल्क अर्जासोबत भरावे लागेल. इयत्ता ६ वीच्या ६० जागा आणि इयत्ता ९ वीच्या ७ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया होत आहे. इयत्ता सहावीतील प्रवेशासाठी उमेदवार १ एप्रिल २००८ ते ३१ मार्च २०१० (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान जन्मलेला असावा. इयत्ता नववीतील प्रवेशासाठी उमेदवार १ एप्रिल २००५ ते ३१ मार्च २००७ (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान जन्मलेला असावा. सहावी आणि नववीतील १५ टक्के जागा अनुसुचित जाती, ७.५ टक्के जागा अनुसुचित जमाती, तर २५ टक्के जागा आजी व माजी सैनिकांची मुले यांच्यासाठी राखीव असतील. तसेच ६७ जागा महाराष्ट्र राज्यातील मुलांसाठी आणि ३३ जागा इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील मुलांकरिता राखीव असतील.

अधिक माहितीसाठी सातारा येथील सैनिक शाळेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी अथवा ०२१६२-२३५८६०/२३८१२२ या क्रमांकावर वर संपर्क साधावा. सातारा सैनिक स्कूल हे प्रवेश परीक्षेसंदर्भात कोणत्याही मार्गदर्शन केंद्राला किंवा एजंटला प्रोत्साहन देत नाही. शाळेत प्रवेश फक्त लेखी परीक्षा आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारेच दिला जाईल, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.