राज्यपालांच्या उपस्थितीत महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचा पदवीदान समारंभ

0
11

नागपूर : महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या 441 विद्यार्थ्यांना पदवी तसेच उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी बजावणाऱ्या विद्यार्थ्यांना 24 सुवर्ण आणि 8 रौप्य पदके देऊन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी गौरव केला.

डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृह येथे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाचा सातवा पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी गोविंद वल्लभपंत कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मंगल राय, कुलगुरु प्रा. आदित्यकुमार मिश्रा, कुलसचिव बी.वा.राणे आदी उपस्थित होते.

समारंभामध्ये 285 पदवी, 150 पदव्युत्तर आणि 6 आचार्य पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी बजावणाऱ्या 32 पदकांपैकी 42 टक्के पदके विद्यार्थींनींना मिळाली आहेत. मुंबईच्या पशू वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थीनी थॉमस युनिस हिला 7 सुवर्ण पदके आणि 1 रौप्य पदक, नागपूरच्या पशू वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रणव चव्हाण याला 2 सुवर्ण आणि 5 रौप्य पदके राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

डॉ. मंगल राय म्हणाले, ग्रीन हाऊस वायू निर्मितीमुळे पर्यावरणाच्या जैव विविधतेचे नुकसान झालेले आहे. परंतु पशुधनाच्या उत्सर्जनापासून कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी लाभ होतो. यामुळे शाश्वत अन्नधान्याचे उत्पादन घेणे शक्य आहे. यासाठी पर्यावरणाची जाण ठेवून पशूधन जोपासण्याची आवश्यकता आहे. जनुकीय अभियांत्रिकी बदलामुळे एकत्रित उत्पादन व प्रजनन करणे सोईचे होईल. यामुळेच एकात्मिक पशुधन उत्पादनास नवी दिशा मिळेल.

राज्यात पशूधन व उपजीविका या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे एकात्मिक शेती हे उपजीविकेचे साधन असून त्यात मत्स्यपालन व वैरण उत्पादनाचाही सहभाग आहे. दूध उत्पादन तसेच मत्स्य संवर्धनामध्ये विविध संधी उपलब्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कुलगुरु प्रा. मिश्रा यांनी स्वागतपर भाषणात विद्यापीठातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची तसेच विकास प्रकल्पांची माहिती दिली. पशूपालन, कुक्कूट पालन, दुग्धतंत्रज्ञान व मत्स्य व्यवसाय क्षेत्राच्या गरजांवर आधारित संशोधन कार्य संशोधनाला विशेष प्राधान्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.