प्रशासनाची विश्वासार्हता वाढविण्यासाठी आत्मपरिक्षण करणे आवश्यक- मुख्यमंत्री

0
83

मुंबई : प्रशासनामध्ये चांगले काम करणाऱ्यांना पुरस्कार तर वाईट काम करणाऱ्यांचा तिरस्कार होईल. राज्याच्या प्रशासनात एवढी शक्ती आहे की त्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचे परिवर्तन करणे सहज शक्य होईल. प्रशासनाप्रती असलेला विश्वासार्हतेचा अभाव दूर करण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाविषयी आदर असला पाहिजे, तो कसा वाढेल त्याबद्दल आत्मपरिक्षण करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सह्याद्री अतिथीगृहाच्या सभागृहात नागरी सेवा दिन-2015 साजरा करण्यात आला त्यानिमित्त झालेल्या सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर महसूल मंत्री एकनाथराव खडसे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.पी.एस. मीना व मुख्य पोस्ट मास्टर जनरल अशोक कुमार दास आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्य तसेच केंद्र शासनातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

नागरी सेवा दिनाच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील नागरी सेवेतील अधिकाऱ्यांनी उत्तम काम केले आहे. आपल्या अधिकाराचा वापर अधिक लोकाभिमुखपणे करता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्याला मिळालेला अधिकार हा जनतेच्या सेवेकरिता आहे. त्यांच्यापर्यंत सेवा पोहोचविणे आपले कर्तव्य आहे, ही भावना प्रत्येकात रुजली पाहिजे. सध्या प्रशासनावर आलेले विश्वासार्हतेच्या अभावाचे संकट दूर करण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाविषयी जनतेत आदर असला पाहिजे. लोकाभिमुख प्रशासनासह ते पारदर्शकदेखील असणे आवश्यक आहे. जनतेसाठीच प्रशासन असल्याने पारदर्शकतेला महत्त्व आहे, त्याचा विसर पडता कामा नये. चांगला अधिकारी आव्हाने स्वीकारतो व वंचितांपर्यंत पोहोचवतो. अधिकाऱ्यांची जिथे नियुक्ती केली तिथे त्यांनी चांगले काम करुन दाखविले पाहिजे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

प्रशासनात चांगल्या लोकांची कमतरता नाही. परंतु चांगल्याला चांगले न म्हणण्याची प्रवृत्ती वाढल्याने चांगले काम करण्याची भावना कमी होत चालली आहे. यापुढे प्रशासनात चांगल्यांना पुरस्कार व वाईटाचा तिरस्कार करण्यात येईल याची जाण ठेवावी. ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्यांच्या जबाबदारीत वाढ झालेली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

श्री. खडसे म्हणाले, प्रशासनातील अधिकाऱ्यांचे आरोग्य चांगले राहिले तर प्रशासनाचेही आरोग्य आणि त्याबरोबरच समाजाचे आरोग्य चांगले राहील. नागरी सेवेतील अधिकाऱ्यांची दरवर्षी वैद्यकीय चाचणी केली जाते. त्याच धर्तीवर आता वर्ग 1 व वर्ग 2 अधिकाऱ्यांची देखील तपासणी केली जावी. राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा पंतप्रधान पुरस्कार देऊन गौरव केला जातो. त्याचप्रमाणे पुढील वर्षापासून मुख्यमंत्री महोदयांच्या नावाने अशा प्रकारचा पुरस्कार सुरु करावा असेही ते म्हणाले.

अधिकाऱ्यांनी अधिकाराचा वापर करीत चांगल्या कल्पना राबविल्या तर समाज त्याचे स्वागत करतो. त्यामुळे अशा कल्पना अधिकाधिक राबवाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.

श्री. क्षत्रिय म्हणाले, प्रशासनात चांगले काम करणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांची नोंद घेणे आवश्यक आहे. चांगल्या कामांची प्रशंसा व्हावी. त्याचबरोबर अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी कार्यशाळा देखील वर्षातून दोन वेळा घेण्यात यावी. ज्या अधिकाऱ्याने क्षेत्रीयस्तरावर चांगला प्रयोग करुन विकासाला हातभार लावला आहे तो प्रयोग राज्यव्यापी झाला पाहिजे, असे सांगून त्यांनी सिंधुदूर्ग जिल्ह्यातील पेपरलेस कार्यालयाचे उदाहरण यावेळी दिले. राज्य शासन सेवा हमी कायदा आणत आहे, त्याअंतर्गत नागरिकांना 160 सेवा ऑनलाईन देण्यात येणार आहेत. या सेवा लवकरात लवकर देण्यासाठी सर्वांनी निर्धार केला पाहिजे, असे आवाहनही मुख्य सचिवांनी केले.

श्री. मीना यांनी प्रास्ताविक केले. यावेळी टपाल विभागाच्या विशेष कव्हरचे अनावरण मुख्यमंत्र्यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास राज्य प्रशासनातील विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी, पारितोषिक विजेत्या अधिकाऱ्यांचे कुटुंबिय आदी उपस्थित होते.

राजीव गांधी प्रशासन गतिमानता अभियान पुरस्कार विजेते वर्ष 2013: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालिन आयुक्त डॉ.श्रीकर परदेशी, उपायुक्त डॉ. उदय टेकाळे, संगणक अधिकारी निळकंठ पोमन यांना ‘सारथी’ यासाठी तसेच नांदेडचे जिल्हाधिकारी धीरज कुमार, अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.निशिकांत देशपांडे यांना सुगम-सुलभ गतिमान महसूल यासाठी तसेच कॉप्रेहेन्सिव्ह ट्रान्सफॉर्मेशन युजिंग टेक्नॉलॉजी अँड प्रोसेस रिइंजिनिअरिंग यासाठी सेतू कार्यालय माहिती तंत्रज्ञान संचालनालयाचे संचालक विरेंद्र सिंह यांना गौरविण्यात आले.

राजीव गांधी प्रशासन गतिमानता अभियान पुरस्कार विजेते वर्ष 2014: संगणकीकृत लेखा परिक्षणाच्या प्रस्तावासाठी तत्कालीन विक्रीकर आयुक्त डॉ.नितीन करीर, विक्रीकर उपायुक्त प्रमोद डुमरे, नितीन शालीग्राम, विक्रीकर सहायक आयुक्त गोविंद बिलोलीकर, मुख्य दक्षता अधिकारी विनय कारगावकर यांना तसेच शोध प्रस्तावासाठी तत्कालीन लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ.रविंद्र सिंघल, विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था डॉ. प्रभात कुमार, सहायक पोलीस निरीक्षक रितेश अहिर, दत्तात्रय किंद्रे, पोलीस नाईक विजय चव्हाण व मंगेश चौगुले यांना सन्मानित करण्यात आले.

सैनिक कल्याण विभागातील माजी सैनिकांचे निवृत्तीवेतन योजनेच्या उत्कृष्ट कार्याबद्दल संचालक सुहास जतकर यांना तसेच उत्कृष्ट कार्याबद्दल नागरी सेवा दिन-2015 चा पुरस्कार गृहनिर्माण विभागाचे उपसचिव रा.ग.साळवी यांना देऊन गौरविण्यात आले.

क्षेत्रीय स्तरावर 2012-13 या वर्षात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गौरविण्यात आलेल्या तत्कालीन अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे : विकास देशमुख- जिल्हाधिकारी, पुणे; संजीव कुमार- जिल्हाधिकारी, अहमदनगर; धीरज कुमार-जिल्हाधिकारी, नांदेड; रामचंद्र कुलकर्णी- जिल्हाधिकारी, वाशिम; अभिषेक कृष्णा- जिल्हाधिकारी, गडचिरोली; विरेंद्र सिंह- जिल्हाधिकारी, सिधुदुर्ग; किशोर तावडे, अपर जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग; प्रदीप पाटील, उपायुक्त (रोहयो), पुणे ; आर.व्ही. गमे, अपर जिल्हाधिकारी, नाशिक; सुरज मांढरे, उपायुक्त महसूल, औरंगाबाद; चिंतामणी जोशी, अपर जिल्हाधिकारी, बुलढाणा; सी.एस.डहाळकर, अपर जिल्हाधिकारी, चंद्रपूर; रवींद्र हजारे, उप विभागीय अधिकारी, महाड; विजयसिंह देशमुख, उपविभागीय अधिकारी, बारामती; उदय किसवे, उपजिल्हाधिकारी (सिंहस्थ कक्ष), नाशिक; निशिकांत देशपांडे, निवासी उप जिल्हाधिकारी, नांदेड; ए.एम.अमानकर, उप जिल्हाधिकारी, अमरावती; निशिकांत सुके, उप जिल्हाधिकारी (गोसेखुर्द पुनर्वसन), नागपूर.

क्षेत्रीय स्तरावर 2013-14 या वर्षात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गौरविण्यात आलेल्या तत्कालीन अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे : ओमप्रकाश बकोरिया, जिल्हाधिकारी, नंदूरबार; विक्रम कुमार, जिल्हाधिकारी, औरंगाबाद; किरण कुरुंदकर, जिल्हाधिकारी, बुलढाणा; एन.नवीन सोना, जिल्हाधिकारी, वर्धा; प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी, सोलापूर; चंद्रशेखर ओक, जिल्हाधिकारी, मुंबई शहर; प्रवीण शिंदे, अपर जिल्हाधिकारी, रायगड; बी.एच.पालवे, अपर जिल्हाधिकारी, नाशिक; जितेंद्र पापळकर, उपायुक्त (महसूल), औरंगाबाद; चिंतामणी जोशी, अपर जिल्हाधिकारी, बुलढाणा ; श्रीमती माया पाटोळे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई शहर; सचिन इथापे, उप विभागीय अधिकारी, विटा (सांगली); संदीप निचित, उप विभागीय अधिकारी, संगमनेर (अहमदनगर); संतोषकुमार देशमुख, उप जिल्हाधिकारी (रोहयो), बीड; गजेंद्र बावणे, उप जिल्हाधिकारी, अमरावती; श्रीमती आशा पठाण, उप जिल्हाधिकारी (भूसंपादन क्र.3), नागपूर.

नागरी सेवा दिन-2015 केंद्र शासनाचे सत्कारमूर्ती अधिकारी : जॉय आर्यकारा, उप महाव्यवस्थापक स्टेट बँक ; आलोक बोहरा, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे ; सय्यद मो. राझी, उपमुख्य दक्षता अधिकारी मध्य रेल्वे.