मुख्यमंत्री साहेब, मला काही सांगायचयं !

0
9

नागपूर दि. २४:- “जागतिकीकरणाच्या युगातही विदर्भातील तरुण मागे का पडतात?‘ या विषयावर व्हिजन नेक्‍स्ट फाउंडेशनच्या वतीने निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी साहित्य पाठविण्याची अंतिम मुदत 5 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. या स्पर्धेतून बेरोजगारी व इतर मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकणारी माहिती, सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविली जाणार आहे.

निबंध स्पर्धेच्या अनुषंगाने व्हिजन नेक्‍स्ट फाउंडेशनला आतापर्यंत यवतमाळ, बुलडाणा, वर्धा, गोंदिया जिल्ह्यातून हिंदी, मराठी व इंग्रजी भाषेतून 498 निबंध प्राप्त झाले आहेत. अनेकांनी निबंध ई-मेलने पाठविले. त्यामुळे त्यांना पोचही प्राप्त झाली. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांची यादी दिवसेंदिवस वाढत असून दर्यापूर, देऊळगावराजा, वरुड येथून स्पर्धक साहित्य पाठविण्यासाठी निबंध स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदतीचा कालावधी वाढविण्याची विनंती करीत आहेत. त्यामुळे स्पर्धकांच्या आग्रहाखातर 5 जुलैपर्यंत मुदत वाढविण्यात आल्याची माहिती संस्थेचे सचिव मनोज चव्हाण यांनी दिली. या स्पर्धेसाठी येणारे सर्व निबंध परीक्षकांद्वारे तपासले जाणार आहेत. पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे 21, 15 व 11 हजार रुपयांचा रोख पुरस्कार देण्यात येणार आहे. याशिवाय दहा स्पर्धकांना प्रत्येकी पाच हजार तर 100 निबंधांना विशेष प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. स्पर्धकांना info@visionnext या मेल आयडी ई-मेल करता येईल तसेच www.visionnext.in या संकेतस्थळावर भेट देता येईल, असेही मनोज चव्हाण यांनी सांगितले.