खोपडेंच्या शैक्षणिक पात्रतेत तफावत; सदस्यत्व रद्द करण्याची मागणी

0
6

नागपूर दि. २४: खोटी शैक्षणिक पात्रता दाखविण्याचे एकएक प्रकरण समोर येत असताना आता पूर्व नागपूरचे आमदार व भाजपाचे शहर अध्यक्ष कृष्णा खोपडे यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रात दोन वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रता नमूद केल्याचे समोर आले आहे. खोपडे यांनी २00९ व २0१४ च्या निवडणुकीत सादर केलेले शपथपत्र जारी करीत खोपडे यांनी शिक्षणाच्या बाबतीत खोटे शपथपत्र दिल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. निवडणूक आयोगाची फसवणूक केल्यामुळे खोपडे यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणीही लोंढे यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने आ. खोपडे यांनी २00९ मध्ये सादर केलेले शपथपत्र व २0१४ मध्ये जारी केलेले शपथपत्र प्रसिद्ध केले आहे. २00९ च्या निवडणूक शपथपत्रात आ. खोपडे यांनी त्यांची शैक्षणिक पात्रता १२ वी पास व बी.कॉम. प्रथम वर्ष अशी नमूद केली आहे.
तर त्यानंतर पाच वर्षांनी २0१४ मध्ये सादर केलेल्या निवडणूक शपथपत्रात शैक्षणिक पात्रता ७ वी पास असल्याचे व विद्या नाईट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज इतवारी येथून पास झाल्याचे नमूद केले आहे. एकाच व्यक्तीने दिलेल्या दोन शपथपत्रात वेगवेगळी शैक्षणिक पात्रता कशी दाखविली जाऊ शकते, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला असून याप्रकरणी खोपडे यांनी निवडणूक आयोगाची सपशेल फसवणूक केली असल्याचा दावाही लोंढे यांनी केला आहे. नैतिकतेवर बोलणारी भाजपा आता खोटे शपथपत्र देणार्‍यांवर गप्प का, असा सवाल लोंढे करीत याप्रकरणी पक्षाने खुलासा करावा, अशी मागणीही लोंढे यांनी केली आहे.