मायक्रोसॉफ्टच्या मदतीने मेळघाटातील हरिसाल देशातील पहिले आदर्श डिजिटल व्हिलेज होणार

0
13

अमरावती दि. १६: पंतप्रधानांच्या विविध महत्त्वपूर्ण कार्यक्रमात डिजिटल इंडिया हा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे. शहरी भागात स्मार्ट सिटी आणि ग्रामीण भागात स्मार्ट व्हिलेजेसची ही संकल्पना आहे. मेळघाटातील हरिसाल हे गाव मायक्रोसॉफ्टच्या मदतीने येत्या 100 दिवसात देशातील पहिले आदर्श डिजिटल व्हिलेज करण्यात येणार असून सर्व विभागप्रमुखांनी सांघिक प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले.

मायक्रोसॉफ्टचे भारताचे प्रमुख प्रशांत शुक्ला, अकाऊंट टेक्नॉलॉजी स्ट्रॅटेजिस्ट बालचंद्रन नायर, समिक्षा तसेच मुख्यमंत्री कार्यालयाचे आयटी प्रमुख कौस्तुभ धवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी लांडगे, विविध खात्याचे प्रमुख यांनी हरिसाल गावात ग्रामपंचायत, बँक ऑफ महाराष्ट्र, अंगणवाडी, पोस्ट बेसीक आश्रमशाळा तथा कनिष्ठ महाविद्यालय, स्वस्त धान्य दुकान यांना भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थांशी विविध विषयावर चर्चा करताना जिल्हाधिकारी बोलत होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या अमेरिका दौऱ्यात मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी नाडेला यांनी मायक्रोसॉफ्टच्या मदतीने भारतात एक आदर्श डिजिटल व्हिलेज करुन देण्याचे मान्य केले होते. त्या अनुषंगाने ऑगस्ट महिन्यात मंत्रालयात बैठक झाली. देशातील पहिले आदर्श डिजिटल गाव साकारण्यासाठी मेळघाटातील हरिसाल या गावाची निवड करण्यात आली असून त्या दृष्टीने आज पाहणी करण्यात आली. हरिसालमध्ये डिजिटल व्हिलेज केले तर अधिकाऱ्यांचाही आत्मविश्वास वाढेल. राज्यात कुठेही अशा प्रकारचे अनेक डिजिटल व्हिलेज करणे सोईचे होईल.

डिजिटल व्हिलेज करण्यासाठी 14 लोकांची समिती नेमण्यात आली असून गटविकास अधिकारी हे नोडल ऑफिसर म्हणून राहणार आहेत. गावातील तरुणांना त्यांच्या इच्छेप्रमाणे कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मायक्रोसॉफ्ट मार्फत देण्यात येणार आहे. कृषि मालावर आधारित प्रक्रिया उद्योग, माती परीक्षण, दुग्ध विकास, भाजीपाला उत्पादन, बचत गट स्थापन करुन त्याद्वारे वनोपज विक्री, हवामानाचा अंदाज, पिकपद्धती, पावसाचा अंदाज, पिक व्यवस्थापन आदी माहितीचे डिस्प्ले बोर्ड लावण्यात येणार आहेत.

अंगणवाडीतील सर्व मुलांची ऑनलाईन नोंदणी, त्यांचे वजन, सुधारणा आदी नोंदी होतील. बँकेत सर्व खातेदारांना एटीएम कम डेबीट कार्ड देण्यात येणार आहे. मोबाईल बँकिंग सेवा वाढविण्यात येणार आहे. बँकांच्या सीएसआर बजेट मधून सोलार लाईट लावण्यात येणार आहे. स्वॉईल कार्ड प्रमाणेच हेल्थ कार्ड ही बनविण्यात येईल. कुपोषण नष्ट कमी करुन मातांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तसेच आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी हरिसाल व सेमाडोह येथे टेलीमेडिसीनच्या सोई सुरु करण्यात येतील. अंगणवाडी सेविका व शिक्षकांना संगणक साक्षरतेचे धडे मायक्रोसॉफ्ट मार्फत देण्यात येणार असून आगामी काळात ऑनलाईन ग्रामसभा तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुद्धा करण्यात येईल. शाळेतील विद्यार्थ्यांना हार्डवेअर, सॉफ्टवेअर, मोबाईल टेक्नॉलॉजीचे शिक्षण देण्यात येणार आहे. मेळघाटात मुख्य प्रश्न विजेचा आहे. ऑप्टीकल फायबर वापरुन हा प्रश्न सोडविण्यात येणार आहे. एअरटेल, आयडीया, व्होडाफोन या कंपन्या टॉवर उभारणार असून त्याद्वारे इंटरनेट, 1700 सोलर पॉवर उभारण्यात येणार असून त्यातील बहुतांश मेळघाटात मिळतील.

मायक्रोसॉफ्टचे भारतातील प्रमुख प्रशांत शुक्ला म्हणाले, हरिसाल हे भारतातील पहिले आदर्श डिजिटल व्हिलेज होईल. तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग करुन शासकीय योजनांचा लाभ संबंधितांना देण्यात येईल. प्रत्येकाच्या जीवनात टेक्नॉलॉजी कशी विलक्षणपणे काम करते हे पहायचे आहे. सर्व क्षेत्रात टेक्नॉलॉजीमुळे कसे जीवन बदलते, सर्व सामान्यांचा आर्थिकस्तर उंचावतो हे दाखविण्यात येणार आहे. यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन सांघिक प्रयत्न करावे. सहकार, शैक्षणिक संस्था, लोकांचे सहकार्य यातून निश्चितपणे डिजिटल व्हिलेज संकल्पना साकारणार आहे. डिजिटल व्हिलेज संकल्पनेत मायक्रोसॉफ्टचा टेक्नॉलॉजीचा रोल आहे. वेबसाईट, मोबाईल, एज्युकेशन, इन्फरमेशन सेटअप अप्लिकेशन मोफत पुरविण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाचे आयटी प्रमुख कौस्तुभ धवसे म्हणाले, डिजिटल व्हिलेज साकारण्यासाठी हरिसाल ग्रामस्थांमध्ये प्रोत्साहन दिसून आले. हा प्रकल्प राज्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. डिजिटल व्हिलेज आपले गाव देश व जगाशी जोडले जाणार आहे. डिजिटल व्हिलेज संकल्पनेतून आपण नवे विश्व स्थापन करणार आहोत. गाव किती लहान आहे यापेक्षा आपण किती उत्साह दाखवितो हे महत्त्वाचे आहे. मेळघाटातील हस्तकला, चित्रकला, आयटीच्या माध्यमातून जगात नेता येणार आहे. दिनांक 24 डिसेंबर 2015 पुर्वी आपणास ही संकल्पना साकार करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी लांडगे, विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता घुगल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश घोडके, जिल्हा पुरवठा अधिकारी वानखडे, उपविभागीय अधिकारी राठोड, सरपंच भाऊ चिक्कु धिकार, उपसरपंच गणपतभाऊ, अग्रणी बँक अधिकारी खोरगडे आदींनी आपआपल्या विभागाचे सादरीकरण केले.