आदर्श ग्रामकडे पालकमंत्र्याची पाठ

0
9

खेमेंद्र कटरे
गोंदिया,दि.२२-केंद्रसरकारच्या पावलावर पाऊल ठेवत राज्यात आमदार आदर्श ग्राम योजना राबविण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला खरा पण या योजनेवर सरकारमध्येच गोंधळ आहे.मे महिन्यात अधिसूचना काढली.दोन महिन्यांनी आमदारांना आठवण करून देण्यात आली.या अधिसूचनेनुसार काही आमदारांनी गावे सुध्दा निवडली.तर काही आमदारानी त्याची दखलही घेतली नाही.राज्यातील गावे सक्षम करण्यासाठी आमदार आदर्श ग्राम योजना हाती घेण्यात आली आहे.यात एका आमदाराला एका टर्ममध्ये तीन गावे दत्तक घ्यावे लागणार आहे.मागास भागातील गावांचा विकास साधण्याची संधी आमदारांना असतानाही गोंदिया जिल्ह्यात अनुत्सुकता आहे.खुद्द राज्याच्या मंत्रीमंडळात सामाजिक न्याय व विशेष अर्थसहाय्य मंत्री असलेले ना.राजकुमार बडोले हे या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने या योजनेत पहिल्यांदा त्यांनी निवडलेल्या गावाचे नाव समोर येणे अपेक्षित होते.परंतु अद्याप असे झाले नाही. पाच पैकी फक्त तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहागंडाले यांनी आपल्या मतदारसंघातील चिखली या गावाची निवड केली आहे.
आमदार रहागंडाले यांनी चिखली गावाची निवड करून ११ सप्टेंबरला त्या गावात ग्रामसभा घेऊन गावाच्या विकासाचे नियोजन उपस्थित गावकरी व अधिकारी यांच्यासोबत केले आहे.सर्वप्रथम चिखली गावाला व्यसनमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.सोबतच गाव हिरवेगार करण्यासाठी वृक्षलागवडीवर भर देण्यात आले आहे.
गोंदिया विधानसभा मतदारसंघातून सलग तिसèयांदा निवडून गेलेले गोपालदास अग्रवाल यांनी विकासाच्या बळावर त्यांनी मोदी लाटेतही आपले अस्तित्व कायम राखले.त्यामुळे त्यांनी तरी किमान एका गावाची निवड करणे अपेक्षित होते. परंतु अद्यापही आपल्या मतदारसंघातील आमदार आदर्श गावाची निवड केलेली नाही. आमगाव-देवरीचे आमदार संजय पुराम यांनीही अद्याप गावाची निवड केलेली नाही.तर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.बडोले यांनीही गाव निवडीसंदर्भात कुठलाच पुढाकार घेतलेला नाही.गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे विधानपरिषद सदस्य आमदार राजेंद्र जैन यांना दोन्ही जिल्ह्यातील कुठल्याही एका गावाची निवड करावयाची आहे.परंतु अद्याप त्यांनीही निवडलेल्या गावाची माहिती जिल्हा प्रशासनाकडे दिलेली नाही.यावरून जिल्ह्यातील पाचपैकी फक्त एका आमदारानेच सरकारच्या आमदार आदर्श ग्राम योजनेला प्राधान्य दिले तर इतरांनी त्याकडे पाठ फिरवल्याचेच चित्र आहे.या योजनेंतर्गत आमदार विकास निधीव्यतिरिक्त शासनाच्या विविध विभागाच्या योजनांचा निधी आणून त्या गावाचा विकास करावयाचा आहे.