भाजपाचे ज्येष्ठ नेते व उत्तम संसदपटू प्रा. राम कापसे कालवश

0
12

मुंबई, दि. २९ – उत्तम संसदसपूट, संघटन कौशल्य, मनमिळाऊ आणि प्रामाणिक राजकारणी म्हणून ओळखले जाणारे माजी राज्यपाल व भाजपाचे ज्येष्ठ नेते रामभाऊ कापसे यांचे मंगळवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.

नगरसेवक ते राज्यपाल असा पल्ला गाठणारे राम कापसे यांचा जन्म १९३३ साली ठाणे जिल्ह्यातील जव्हार येथे झाला होते. १९५९ ते ९३ या काळात त्यांनी रुपारेल महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून केले. त्यानंतर कापसे हे राजकारणात सक्रीय झाले. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात भाजपाची पाळेमुळे रुजवण्यात कापसे यांनी मोलाचे योगदान दिले होते. उत्तम संघटन कौशल्यासोबत मनमिळाऊ स्वभाव असल्याने राम कापसे हे नेहमीच जनतेशी थेट संपर्कात होते. कल्याण विधानसभा मतदारसंघ हा त्यांचा बालेकिल्ला होता. १९८९ ते ९६ या काळात ठाणे लोकसभा मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले होते. यानंतर त्यांनी राज्यसभेत खासदारकी देण्यात आली होती. डोंबिवली लोकल सुरु करण्यासाठी कापसे यांनी अथक प्रयत्न केले होते. २००४ ते २००६ मध्ये ते अंदमान – निकोबारचे नायब राज्यपालपदही त्यांनी भूषवले होते. अंदमान निकोबारला त्सुनामीतून सावरण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.

ध्येयनिष्ठ मार्गदर्शक हरपला : मुख्यमंत्री

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व अंदमान आणि निकोबारचे माजी नायब राज्यपाल प्रा. राम कापसे यांच्या निधनाने संपूर्ण आयुष्य एका ध्येयपूर्तीसाठी वाहून घेणारा एक ज्येष्ठ मार्गदर्शक आपण गमावला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
प्रा. कापसे आयुष्यभर राष्ट्रवादाच्या प्रसारासाठी झटत राहिले. केवळ कल्याण-डोंबिवली परिसरातच नव्हे तर संपूर्ण राज्यात जनसंघ आणि त्यानंतर भारतीय जनता पक्ष वाढविण्याचे काम त्यांनी केले. राज्यात पक्षाची उभारणी करणाऱ्या बिनीच्या शिलेदारांपैकी ते एक धुरीण होते. जनसंघाचे काम वाढविताना त्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली, आज ही सर्व मंडळी समाजाच्या विविध क्षेत्रात धडाडीने कार्यरत आहेत. पक्षकार्य आणि राष्ट्रवाद हेच नेहमी त्यांच्या चिंतनाचे विषय असत. विविध आघाड्यांवर सक्रीय असतानाही त्यांनी स्वत:ला प्रसिद्धीपासून कायम दूर ठेवले. कल्याण-डोंबिवली महापालिकेत नगरसेवक पदापासून सुरु झालेला त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून राजकीय प्रवास महाराष्ट्र विधिमंडळासह देशाच्या सर्वोच्च सभागृहाचे सदस्यत्व भूषविण्यापर्यंत उंचावत गेला. या साऱ्या प्रवासात त्यांनी जनसामान्यांशी आपली बांधिलकी कायम ठेवली.
अंदमानमध्ये नायब राज्यपाल असताना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अन्य क्रांतिकारकांचे एक छोटेखानी स्मारक उभारले आणि त्याचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य राम शेवाळकर यांच्या हस्ते केले होते. समाजकार्याचा वसा हा आपल्या घरातूनच प्रारंभ झाला पाहिजे, हा त्यांचा दंडक होता. म्हणूनच आज त्यांचे संपूर्ण कुटुंबच समाजकार्यात अग्रेसर आहे. एक उत्तम व अभ्यासू वक्ता तसेच शिक्षण तज्ज्ञ म्हणूनही त्यांची ख्याती होती, असेही श्री. फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.