निधीचा योग्य विनियोग करा- पालकमंत्री बडोले

0
9

गोंदिया,दि. २९ : गोंदिया आणि तिरोडा नगर परिषदेअंतर्गत नागरी दलीत वस्ती सुधारणेची कामे दर्जेदार झाली पाहिजे. मिळालेल्या निधीचा या कामासाठी योग्य विनियोग करण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात (दि.२८) दोन्ही नगर परिषदेअंतर्गत नागरी दलीत वस्ती सुधारणा कामाचा आढावा घेतांना पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, भाजपा जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, जिल्हा नियोजन अधिकारी बकुळ घाटे, नगर रचनाकार श्री.डांगे, गोंदिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी गुणवंत वाहुरवाघ, तिरोडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले म्हणाले, गोंदिया व तिरोडा नगर परिषदेच्या क्षेत्रातील दलीत वस्त्यांची कामे करतांना तेथे मुलभूत सुविधांवर भर देण्यात यावा. केवळ रस्त्यांची कामे करु नये. तर या वस्त्यांमध्ये सार्वजनिक शौचालय, सांडपाण्यासाठी चांगली गटारे, दिवाबत्ती सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करुन दयावी.
जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी म्हणाले, समप्रमाण निधी विविध विकास कामांवर खर्च करावा. लोकसंख्येच्या आधारावर निधीचे वाटप करावे. नगररचना विभागाने मंजूर केलेल्या नकाशानुसारच कामे करण्यात यावी. कोणत्या कामाची आवश्यकता आहे हे प्राधान्यक्रम ठरवून कामे करावी. सन २०१५-१६ या वर्षाकरीता गोंदिया नगर परिषदेला ३ कोटी ३७ लाख रुपये तर तिरोडा नगर परिषदेला ४४ लाख रुपये मंजूर करण्यात आले. सन २०१२-१३ ते २०१४-१५ या वर्षात नागरी दलीत वस्ती योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामाची माहिती यावेळी देण्यात आली.
०००००