अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. श्रीपाल सबनीस

0
26
पुणे  दि. ७ – पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस विजयी झाले. कवी विठ्ठल वाघ यांचा त्यांनी 112 मतांनी पराभव केला.
संमेलनाध्यक्षपदासाठी गेल्या दीड महिन्यापासून निवडणूक सुरू होती. सबनीस, वाघ यांच्याबरोबरच अरुण जाखडे, शरणकुमार लिंबाळे आणि श्रीनिवास वारुंजीकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते; पण सबनीस, वाघ आणि जाखडे यांच्यातच खरी लढत होईल, असे चित्र प्रचारादरम्यान निर्माण झाले होते. त्यामुळे गुरुवारी झालेल्या मतमोजणीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मतमोजणीनंतर सबनीस यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले. 
 
महाराष्ट्रातील आणि बृहन्‌ महाराष्ट्रातील एक हजार 75 पैकी एक हजार 33 मतदारांनी या निवडणुकीसाठी मतदान केले. यापैकी 20 मतपत्रिका अवैध ठरल्या. वैध ठरलेल्या मतदानापैकी सबनीस यांना 485, वाघ यांना 373, जाखडे यांना 230, लिंबाळे यांना 25 तर वारुंजीकर यांना 2 मते मिळाली, असे निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद आडकर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.या वेळी स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनील महाजन उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. श्रीपाल मोहन सबनीस यांचा परिचय:
नाव : प्राचार्य डॉ. श्रीपाल मोहन सबनीस
जन्मस्थान : हैद्राबाद मुक्ती संग्रामाची क्रांतीभूमी- हाडोळी, ता. निलंगा, जि. लातूर (मराठवाडा)
ऐतिहासिक वारसा : हैद्राबाद स्टेटमधील निजामाच्या रझाकार सेनेशी तीनशे बंदुकांच्या हत्यारबंद टोळीसह हाडोळी, तालुका निलंगा येथील स्वत:च्या बुरुजावरून लढणाऱ्या क्रांतिकारी मोहनराव पाटील (सबनीस) यांच्या पोटी शेतकरी कुटुंबात 1950 ला जन्म.
विशेष वारसा : श्री. वसंत पोतदार लिखित “हैद्राबाद मुक्ती संग्राम‘ या महाराष्ट्र शासन अनुदान पुरस्कृत आणि स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशित ग्रंथातील प्रदीर्घ प्रकरण “बंडखोर मोहनराव पाटील‘.
सेवा : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील तौलनिक भाषा विभागप्रमुख आणि प्रोफेसर म्हणून कार्य, तसेच कला विद्याशाखेचे डीन म्हणून कार्य आणि प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त.
 
।। ग्रंथ संपदा ।।
1. ज्ञानेश्वर ते आंबेडकर
2. सेक्युलर वाड्‌:मयीन अनुबंध
3. ब्राह्मणी सत्यशोधकाचे अब्राह्मणी सौंदर्यशास्त्र
4. भारतीय प्रबोधन आणि नव-आंबेडकरवाद
5. संस्कृती समीक्षेची तिसरी भूमिका
6. सेक्युलॅरिझम : प्रबोधनाचा मानदंड
7. परिवर्तनवादी प्रवाहाची तौलनिक समीक्षा
8. साने गुरुजी विचार जागर
9. ब्राह्मणी सत्यशोधक
10. उगवतीचा क्रांतिसूर्य
11. भारतरत्न आणि बहिष्कृत भारत
12. संत नामदेव तुकारामांचे सांस्कृतिक संचित
13. नारायण सूर्व्यांच्या कवितेची इहवादी समिक्षा
14. संत साहित्यातील सेक्युलॅरिझम
15. समतोल समीक्षा
16. इहवादी संस्कृती शोध
17. आदिवासी, मुस्लीम, ख्रिश्चन साहित्य मीमांसा
18. तौलनिक साहित्य आणि भाषांतर मीमांसा
19. विद्रोही अनुबंध
20. कलासंचित
21. बृहन्महाराष्ट्राचे वाड्‌:मयीन संचित
22. नामदेवांचे संतत्व आणि कवित्व
।। ललित लेखन ।।
23. मुक्तक
24. उपेक्षितांची पहाट
25. जीव रंगला रंगला
।। संपादित ग्रंथ ।।
26. फ. म. शहाजिंदे यांची निवडक कविता
27. संस्कृती स्पंदनाचा मराठी आलेख
28. महाराष्ट्राच्या इतिहासातील स्त्रियांचे योगदान
29. प्रबोधनपर्व (प्रा. विलास वाघ गौरवग्रंथ)
।। नाटक ।।
30. शुक्राची चांदणी (वगनाट्य)

31. मुंबईला घेऊन चला (वगनाट्य)

।। एकांकिका ।।

1. सत्यकथा 82 (सुवर्णपदक विजेती एकांकिका)
2. क्रांती (राज्यस्तरीय लेखन व प्रथम पुरस्कार)
3. कॉलेज कॉर्नर

याशिवाय, सबनीस यांनी महाराष्ट्रातील सुमारे 69 लेखक, कवींच्या कवितासंग्रह, कांदबरी, नाटक लेखनसंग्रह, स्तंभलेखन इ. वाड्‌:मयीन पुस्तकांना प्रस्तावना दिल्या आहेत. त्यांचे अनेक विषयांवर महाराष्ट्रातील नामवंत नियतकालिकांत सुमारे 400 च्या वर लेख प्रकाशित झाले आहेत.