परक्या भावांच्या आपुलकीने पाणावले बहिणींचे डोळे

0
5

आमगाव ,दि. १६-: आर्थिक दुर्बलांच्या सांसारिक जीवनातील कटू सत्य सर्वांसाठी नवीन नाही. परिश्रमातून मार्गक्रमण करीत त्यांचे कुटुंब नेहमीच हलाखीच्या परिस्थितीला सामोरे जातात. अशा आर्थिक दुर्बलांच्या लोकवस्तीत त्यांना दिवाळी व भाऊबीजची भेट देण्याचा प्रयत्न युवा शक्ती फाऊंडेशनने केला आहे. त्यांच्या या भेटीने मात्र लोकवस्तीतील परक्या भावांच्या आपुलकीने बहिणींचे अक्षरश: डोळे पाणावले तर क्षणिक आनंदाने काही क्षण आनंदाच्या उजेडाने बहरले.

आमगाव शहरातील बिंजवार या लोकवस्तीत हलाखीचे जीवन जगणारे कुटुंब प्रत्येकाच्या नजरेआड आहे. त्यांच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी कोणालाही हात घालता आले नाही. त्यामुळे दैनंदिन परिश्रमातून आपल्या जीवनात आनंद वेचण्याचा प्रयत्न हे कुटुंब करीत आहेत. अशा कुटुंबात उत्सव, सण आर्थिक अडचणीतच असतात. त्यामुळे वेळेत मिळणारे आनंद त्यांच्या जीवनात बदल घडवून आणतात. अशाच लोकवस्तीची दखल घेत युवा शक्ती फाऊंडेशनने दिवाळी व भाऊबीजचे उपक्रम घेतले.

या उपक्रमांतर्गत लोकवस्तीतील महिलांना भाऊबीजची भेट म्हणून महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या. या वेळी युवा शक्ती फाऊंडेशनचे संयोजक यशवंत मानकर, पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार, विशाल राजे, पत्रकार संघाचे अध्यक्ष पालकराम वालदे, रितेश अग्रवाल, निमेश दमाहे, निखिल कोसरकर, युवा शक्ती फाऊंडेशनच्या महिला अध्यक्ष ज्योती खोटोले, नरेंद्र कावळे, डॉ. कार्तिक मेंढे, राजीव फुंडे, आनंद मजे, उत्तम नंदेश्वर उपस्थित होते.

सदर उपक्रमात लोकवस्तीतील महिलांसह गणमान्य नागरिक उपस्थित होते. यावेळी महिलांनी उपस्थितांना भाऊबीज ओवाळणी घालून स्वरक्षणाची हमी मिळवून घेतली. तसेच लोकवस्तीतील नागरिकांनी फटाके फोडून दिवाळी व भाऊबीज उत्सवाचा आनंद व्दिगुणित केला.