नायगावकरांच्या कवितेने साहित्यप्रेमी मंत्रमुग्ध

0
14

ठाणे शहर शाखेने केले साहित्य दिंडीचे स्वागत

ठाणे ः कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोळाव्या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर करूळ ते मुंबई या साहित्य दिंडीचे पनवेलच्या पंचमुखी मारुती मंदिराजवळ गुरुवारी सकाळी स्वागत करण्यात आले. यावेळी ठाणे कोमसाप शाखेचे कार्यवाह बाळ कांदळकर, कोषाध्यक्ष राजेश दाभोळकर, समन्वयक विनोद पितळे आणि पत्रकार नितांत कांदळकर यांनी दिंडीचे व दिंडीसोबत आलेल्या साहित्यिकांचे ठाणे कोमसापतर्फे स्वागत केले. साहित्य दिंडीसोबत आलेले कवी तसेच कोमसाप साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष अशोक नायगावकर, ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, कवी प्रा. एल. बी. पाटील, कवी साहेबराव ठाणगे आदी मान्यवरांनी यावेळी आपले विचार मांडले व शुभेच्छा स्वीकारल्या.
कवी, साहित्यिक व ‘नितांत’ प्रकाशनचे प्रकाशक तसेच ठाणे कोमसापचे कार्यवाह बाळ कांदळकर यांनी यावेळी साहित्य पालखीला पुष्पहार अर्पण करून पूजन केले. त्यांच्या हस्ते कवी नायगावकर आणि अरुण म्हात्रे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी कवीद्वयींसह इतरांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. मान्यवरांना नितांत दिवाळी अंकांची भेट देण्यात आली. सत्कार समारंभानंतर अशोक नायगावकर यांनी मराठी भाषेला संपन्न करायचे असेल तर मराठीपणाची कास धरण्याचा आग्रह केला. आपण नेहमीच परभाषेतील शब्द वापरत असतो. त्याऐवजी मराठी शब्दांचा वापर करण्याचा अट्टहास धरला पाहिले, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मराठी भाषेवरील आपली खास कविता सादर करून मराठी भाषा, कोकण, मराठी माणसाची श्रद्धास्थाने यांची महती वर्णन केली. कवी अरुण म्हात्रे यांनी साहित्य दिंडीच्या प्रवासातील अभिमानास्पद प्रसंग सांगितले. पनवेलच्या म्हणजेच रायगड जिह्याच्या वेशीवर ठाणेकर नागरिकांतर्फे व साहित्यिकांतर्फे झालेल्या प्रातिनिधिक सत्काराबद्दल म्हात्रे यांनी कांदळकर व इतरांचे मनापासून आभार मानले.