राज्यभरात साजरा होणार संविधान दिन

0
6

मुंबई, दि. 21 – केंद्र शासनाने दि. 26 नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे. त्यानुसार राज्यातही मोठ्या प्रमाणावर ‘संविधान दिना’चे कार्यक्रम होणार आहेत. नागपूर येथे होणाऱ्या ‘संविधान दिना’च्या मुख्य कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मंत्रीमहोदय व लोकप्रतिनीधी उपस्थित राहणार आहेत. राज्यभरातील कार्यक्रमासंबंधीच्या सूचना सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी संबंधितांना दिल्या आहेत.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून दि. 26 नोव्हेंबर हा ‘संविधान दिन’ म्हणून राज्यभरात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. त्या दिवशी राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी सामाजिक न्यायमंत्री श्री. बडोले यांनी विविध बैठका घेऊन सूचना केल्या आहेत. त्या अनुषंगाने विभागाने परिपत्रक काढून संबंधितांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

‘संविधान दिना’चा मुख्य कार्यक्रम नागपूरमधील यशवंत स्टेडियम येथे सकाळी 9 वाजता होणार आहे. या कार्यक्रमात सुमारे सव्वालाख लोक संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करणार आहेत. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह केंद्रातील व राज्यातील विविध मंत्री, खासदार, आमदार यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात विविध शाळा/महाविद्यालयामधील विद्यार्थी, एन.एस.एस., स्काऊट व गाईड, आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसह स्वयंसेवी संस्थांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असणार आहे.