वन पर्यटन विषयक सर्वंकष धोरण 2 महिन्यात जाहीर करणार- मुख्यमंत्री

0
10

चंद्रपूर : वनसंवर्धनातून विकास हे स्पष्ट करणारे निसर्ग पर्यटन विषयक सर्वंकष धोरण येत्या दोन महिन्यात जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ताडोबा भेटी दरम्यान एका कार्यक्रमात केली. 

ताडोबा प्रकल्पातील मोहर्ली येथे वनविभागाच्या वतीने आयोजित निसर्ग पर्यटन आणि सामुदायिक निसर्ग संवर्धनास चालना देणे या विषयी आयोजित कार्यशाळेचा समारोप आज झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी राज्याचे वित्त व नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. 

चांगली धोरणे कशी राबविता येतील व वनांची संख्या कशी वाढविता येईल यावर शासन सध्या लक्ष देत आहे. वनक्षेत्रात वन्यजीव आणि नागरिक यांच्यातील संघर्ष टाळून एक प्रकारची उपजिवीकेची सुसंधी निर्माण करण्यावर भर आम्ही देत आहोत, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

केनियातील मसाईमाराच्या धर्तीवर स्थानिकांच्या सहभागातून बफर क्षेत्रात पर्यटन संधीचा विकास करण्याबाबत वनविभागाने सविस्तर आखणी केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात निसर्ग पर्यटनासाठी 100 कोटींहून अधिक निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. येणाऱ्या काळात या बफर क्षेत्रातील अधिकाधिक रोजगार निर्मिती करण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केले जातील, असेही मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले.

वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, या कार्यशाळेच्या माध्यमातून विभागाने 99 कार्यक्रमांची आखणी केली आहे. या माध्यमांतून सहा राष्ट्रीय प्रकल्प तसेच टायगर रिझर्व्ह व इतर सर्व प्रकल्पामध्ये वन पर्यटन विकसीत करण्याचे धोरण वन विभागाने निश्चित केले आहे. त्याच्या जोडीला वाघांचे संरक्षण करण्यास आम्ही प्राधान्य दिले आहे. यासाठी महानायक अमिताभ बच्चन यांना ब्रॅंड ॲम्बेसिडर निवडले आहे, अशी माहिती दिली. 

येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला पर्यावरण प्रेमी होण्याच्या दृष्टिकोनातून पर्यटन विकास केला जाईल याची काळजी वनविभागाचे अधिकारी घेतील, असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, वन विभागाच्या या कार्यशाळेच्या माध्यमातून चांगल्या स्वरुपाचे मंथन शक्य झाले आहे. पर्यटन वृद्धीत असणाऱ्या तांत्रिक अडचणींबाबत महाराष्ट्राचेच असणारे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न शासन करेल, असे ते यावेळी म्हणाले.

देशातील टायगर कॅपिटल असणाऱ्या आपल्या या विदर्भाच्या भूमित असणाऱ्या टायगर कॅपिटलची कॅपिटल अर्थात ताडोबा मध्ये आज झाले आहेत. येणाऱ्या काळात ताडोबा सर्वांना मार्गदर्शन करणारे अभयारण्य ठरेल असे पथदर्शी प्रकल्प येथे राबविण्यात यावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले.

या समारोप प्रसंगी आमदार नानाभाऊ शामकुळे, संजय धोटे, किर्तीकुमार भांगडिया, महापौर राखी कंचर्लावार तसेच प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक ए.के.निगम व भगवान आदींची व्यासपिठावर प्रमुख उपस्थिती होती. 

शासनाच्या वर्षपूर्ती निमित्ताने गडचिरोली जिल्हा माहिती कार्यालयातर्फे काढण्यात आलेल्या घडीपत्रिकेचे विमोचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमात झाले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी घडीपत्रिकेबाबत माहिती दिली. कार्यक्रमाची सुरुवात दिपज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन ताडोबा प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक जे.पी.गरड यांनी केले.