२९ नोव्हेंबरला कवलेवाड्यात संत जैपालदास जन्मशताब्दी महोत्सव

0
9

गोंदिया :दि.२५:: संत तुकडोजी महाराजांची प्रेरणा घेऊन लोकहिताचे तसेच समाजप्रबोधनाचे कार्य करणारे संत जैपालदास महाराज यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा येथे रविवारी २९ नोव्हेंबरला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य सप्तखंजेरीवादक तुषार सूर्यवंशी यांचा प्रबोधनात्मक कीर्तनाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाला सामाजिक न्यायमंत्र्यासह अनेक मान्यवरांची हजेरी राहणार आहे.
संत जैपालदास महाराज यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त २९ नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामस्वच्छता, अंधश्रद्धा, हुंडाप्रथा, व्यसनमुक्ती, सर्वधर्मसमभाव यावर सप्तखंजेरीवादक तुषार सूर्यवंशी यांच्या चमूृकडून प्रबोधनात्मक कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. तसेच जेष्ठ नागरिक, उत्कृष्ट महिला बचतगट, गुणवंत विद्यार्थी, पत्रकार, लोकप्रतिनिधी, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यासोबतच कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत स्पर्धा परीक्षांची तयारी यावर मार्गदर्शन होणार आहे. 
कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत २६ नोव्हेंबरला स्पर्धा परीक्षेबद्दल मार्गदर्शन कार्यक्रम होणार आहे. यामध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी करावयाची तयारी, याविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन होणार आहे. महोत्सवाचे उद््घाटन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी खासदार नाना पटोले राहतील. 
प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विजय रहांगडाले, आमदार रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, मुख्य कार्यपालन अधिकारी दिलीप गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम, उपविभागीय अधिकारी प्रदीप माहिरे, गायत्री परिवाराचे जिल्हा समन्वयक मुकुंद भैरम, जि.प. सदस्य मनोहर डोंगरे, पं.स. सदस्य डॉ. बी.एस. रहांगडाले, सरपंच देवन पारधी, उपसरपंच पुरणलाल भैरम आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महोत्सव समिती, ग्रामवासीयांनी केले आहे.