सारस फेस्टीवल १५ डिसेंबर ते ३१ जानेवारी २०१६

0
14

सारसांच्या संवर्धनासाठी प्रशासनाचा पुढाकार
वन्यप्रेमींचाही सहभाग : पर्यटकांचा ओढा वाढणार
गोंदिया,दि.7 : गोंदिया जिल्ह्याची ओळख तलावांचा जिल्हा म्हणून. निसर्ग संपन्न असलेल्या गोंदियात पर्यटक नवेगाव-नागझिरा राष्ट्रीय व्याघ्र राखीव क्षेत्राला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने येतात. जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांचा वापर पूर्वी सिंचनासाठी व्हायचा आता मात्र हे तलाव पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे ते स्थलांतरीत व विदेशी पक्षांच्या काही काळाच्या अधिवासामुळे.
विशेष म्हणजे सारस हा दुर्मिळ आणि मोठा पक्षी राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्यातच आढळतो. या सारस पक्षांचे संवर्धन करुन त्यांची वृद्धी व्हावी तसेच सारस पक्षांना पाहण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक यावेत यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून यावर्षी १५ डिसेंबर २०१५ ते ३१ जानेवारी २०१६ या कालावधीत सारस फेस्टीवलचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पक्षी मित्र, वन्यजीव छायाचित्रकार व पर्यटक सारस बघायला जिल्ह्यात येणार आहे. याच महोत्सवाचे औचित्य साधून हौसी व वन्यजीव छायाचित्रकारांसाठी नवेगाव-नागझिरा ‘फोटोशुटङ्क स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत देशातील नामवंत छायाचित्रकार सुद्धा जिल्ह्यात येणार आहे.
फेस्टीवल दरम्यान सारस बचावासाठी प्रयत्न करणारे शेतकरी सारस मित्र पुरस्काराने सन्मानीत केले जातील. गोंदियातील अनेक शाळांमध्ये सारस चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख मार्गावरील इमारतीच्या भिंती, उड्डाणपुलाच्या भिंती तसेच बिरसी विमानतळापासून परसवाडाकडे जाणाऱ्या विमानतळाच्या सुरक्षा भिंतीवर सारस चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे. बिरसी विमानतळ ते परसवाडा दरम्यान सायकल मॅराथॉन स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. रेल्वे स्टेशन, बसस्थानक व शहरातील मुख्य ठिकाणी सारस फेस्टीवलच्या आयोजनाबाबतचे बॅनर लावण्यात येणार आहे.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशना दरम्यान मुंबई येथील पत्रकारांचा मुक्काम असलेल्या सुयोग या निवासस्थानाला पालकमंत्री राजकुमार बडोले हे भेट देणार असून या पत्रकारांना गोंदिया येथील सारस फेस्टीवल व सारस पक्षी बघायला येण्याचे निमंत्रण देणार आहेत. सारस पक्षांचा मोठ्या प्रमाणात वावर असलेल्या परसवाडा, झिलमिली व घाटटेमनी येथील ग्रामस्थांना या फेस्टीवलमध्ये सहभागी करुन घेण्यात येणार आहे. ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांना सारस संवर्धनाचे महत्व पटवून दिले जाणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सारस फेस्टीवलच्या आयोजनाबाबत ५ डिसेंबर रोजी वन्यजीवन प्रेमी, अधिकारी, हॉटेल व्यवस्थापन, ट्रॅव्हल एजन्सी, बिरसी विमानतळ व्यवस्थापन, वन्यजीव फोटोग्राफर यांचेसोबत बैठक संपन्न झाली. सारस फेस्टीवलच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांचा पुढाकार महत्वाचा ठरणार आहे. या बैठकीला जिल्हा नियोजन अधिकारी बकुल घाटे, वन्यजीव प्रेमी डॉ.राजेंद्र जैन, मुकूंद धुर्वे, भारत जसानी, सुनिल धोटे, अनिल भागचंदानी, रुपेश निंबर्ते, त्र्यंबक जारोडे, डॉ.विजय ताते, अदानी फाउंडेशनचे सुबोध सिंग, बिरसी विमानतळ व्यवस्थापनचे श्री.प्रजापती, हॉटेल गेट वे चे राजेंद्र वामन, हॉटेल ग्रँड सीताचे धर्मेश पटेल, अंकीत पटेल, सोनाली ट्रॅव्हल्सचे महेश गुप्ता उपस्थित होते.
असा आहे सारस
महाराष्ट्रात केवळ गोंदिया जिल्ह्यातच सारस हा पक्षी आढळून येतो. सर्वात मोठा उडणारा पक्षी आहे. नर आणि मादी ही सारसची जोडी आपल्या जोडीदाराची एकदा निवड केल्यानंतर ते आयुष्यभर सोबत राहतात. जोडीदारांपैकी एकाचा जरी मृत्यू झाला तर त्याच्या विरहाने दुसरा अन्नत्याग करुन आपले जीवन संपवितो. जसे इतर पक्षी जंगलात व झाडावर राहतात त्याला मात्र सारस अपवाद आहे. सारस पक्षी मात्र माणसांच्या वस्तीजवळच्या तलावांजवळ व धानाच्या शेतात वास्तव्य करतो. तो शेतकऱ्यांचा व आपलाही एकप्रकारे मित्रच आहे. सारस कधीच झाडावर बसत नाही. तो घरटे सुद्धा धानाच्या शेतात तयार करतो. याच घरट्यात तो अंडी घालून पिल्ल्यांना जन्म देतो. असा हा दुर्मिळ सारस पक्षी. आता त्याच्या संवर्धनाची जबाबदारी आपली सर्वांची आहे.