मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शरद पवारांची तोंड भरून स्तुती

0
11
नागपूर- नागपूर अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 75 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून विधानसभेत आज अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचे तोंड भरून कौतूक केले. शरद पवारांनी सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा वारसा पवारांनी जोपासला आहे. पवारांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच भारतीय क्रिकेट संघाला धोनीसारखा गुणी कर्णधार मिळाला असे गौरद्वोगार फडणवीस यांनी काढले.
12 डिसेंबरला पवारांनी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले. यानिमित्ताने विधानसभेत आज अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला व तो मंजूर करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पवारांवर स्तुतीसुमनं उधळली. फडणवीस म्हणाले, पवारसाहेबांना 50 वर्ष झाली तेव्हा याच सभागृहाने अभिनंदन प्रस्ताव मंजूर केला होता. यशवंतराव चव्हाणांनंतर पवार एकमेव नेते ज्यांचा अभिनंदनपर ठराव होतोय.आपले गुरु यशवंतराव चव्हाण यांचा वारसा त्यांनी समर्थपणे चालवला. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. राजकीय मतभेद कितीही झाले तरी मनभेद न ठेवता सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांनी सौहार्द्याचे संबंध जोपासले. राजकारणात काम करताना पक्ष मर्यादा न ठेवता सर्वपक्षीयांशी चांगले संबंध ठेवले. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर शरद पवार यांच्या उंचीसारखा नेता महाराष्ट्र भूमीत जन्माला आला नाही. या देशातला पहिला मराठी पंतप्रधान पवारांच्या रुपाने मिळेल, असे वाटलं होतं असेही फडणवीस यांनी सांगितले.
राजकारणी म्हणून उत्तम काम केल्यानंतर त्यांनी इतर क्षेत्रातही आपला ठसा उमटविताना जबरदस्त काम केले असे सांगत फडणवीस पुढे म्हणाले की, पवारांनी राजकारणाबरोबरच इतर क्षेत्रातही उत्तम काम केले आहे. क्रीडा क्षेत्रातच बोलायचं झाले तर कबड्डी, खो-खो, कुस्ती यासारख्या खेळांना पवारांनी राजाश्रय मिळवून दिला. क्रिकेटमध्ये तर पवारांनी मोठे योगदान दिले. त्यामुळे एमसीए, बीसीसीआय ते थेट आयसीसीच्या अध्यक्षपदापर्यंत त्यांनी मजल मारली. टीम इंडियाला धोनीसारखा गुणी कर्णधारही पवारांच्या दूरदृष्ट्रीमुळेच मिळाला, असेही फडणवीसांनी सांगितले. आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात पवारांचे काम निर्विवाद आहे. नैसर्गिक, मानवी, राजकीय आपत्ती ते योग्य प्रकारे हाताळतात, असा देशाला अनुभव आहे अशा शब्दांत कौतूक केले.