अध्यात्माचे मॉल्स सुरू होणे म्हणजे अधोगती

0
13

गोंदिया : आध्यात्मिक क्षेत्रातील पहिला बंडखोर संत ज्ञानेश्‍वर. त्यांनी आध्यात्मिक लोकशाही निर्माण केली. तर दलित, शोषित, पीडितांची दु:खे मांडणारा पहिला संत तुकाराम महाराज आहे. या संत परंपरेत प्रपंच आणि परमार्थाचा, प्रपंच नेटका तर परमार्थ नेटका, असे आग्रहाने सांगणारा पहिला संत संर्मथ रामदास आहे. मात्र सध्या अध्यात्माचे मॉल्स सुरू आहेत. समाजमनाची ही अधोगती आहे, असे मार्मिक विचार महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ सदस्य तथा विदर्भ साहित्य संघ नागपूर कार्यकारी मंडळाचे सदस्य प्रकाश पदलाबादकर यांनी व्यक्त केले. विदर्भ साहित्य संघ गोंदियाचे दिवंगत अध्यक्ष रमेशकाका कोतवाल यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त भवभूती रंगमंदिरात ‘अखंड सावधान असावे’ या महामंत्रावर ते प्रमुख वक्ते म्हणून भाष्य करीत होते.याप्रसंगी अध्यक्ष यशवंत सरूरकर व सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख माणिक गेडाम उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, राजकारण कर्त्यांनी संतांची विभागणी जाती-जातीमध्ये केली. ही कृती अत्यंत लज्जास्पद आहे. संतांचे विचार हे मानवी कल्याणाचे कालातित विचार आहेत.सर्मथ हे समाजाला नाही, मनाला उपदेश करणारे संत आहेत. त्यांनी राजे संभाजी महाराजांना लिहिलेल्या ऐतिहासिक पत्रात ‘अखंड सावधान असावे’ असा उपदेश करून बुद्धी आणि विवेकाला आव्हान दिले आहे. असेच आव्हान संत गाडगे महाराज व तुकडोजी महाराज यांनी दिले, असा उल्लेख त्यांनी केला.