शाळेतल्या ‘ती’ची गोष्ट! अल्लड वयातल्या प्रेमावर आधारित नवी वेब सिरीज

0
24
फोटो कॅप्शन : 'ती' आणि शाळा या वेब सिरीजच्या चित्रीकरणाचा मुहूर्त सातारा येथील निनाम गावातील जोतिर्लिंग मंदिरात करण्यात आला. यावेळी दिग्दर्शक आशिष पुजारी आणि स्टुडिओ ०९ प्रॉडक्शनचे निर्माते धनेश रामचंद्र पाटील)

शाळेतल्या ‘त्या’ वयात आपल्या प्रत्येकालाच कोणी ना कोणी ‘ती’ किंवा ‘तो’ नक्कीच आवडत असतो. अजाण वयातल्या त्या भावना प्रत्येकासाठीच कायमच विशेष राहिलेल्या असतात. हाच धागा पकडत ‘ती’ आणि शाळा या नव्या वेब सिरीजची घोषणा स्टुडिओ ०९ प्रॉडक्शनने नुकतीच सोशल मीडियावर केली आहे.

वेब सिरिजच्या शीर्षकावरूनच ही वेब सिरीज शाळेतल्या तिच्या भोवती फिरणारी असल्याचं समजते. शाळेतल्या आठवणींना उजाळा देतानाच त्या अजाण वयात भेटलेल्या ‘ती’ भोवतीची ही कहाणी आहे. पुढे शाळा संपल्यानंतरही त्याच्या आयुष्यात कुठे ना कुठे ‘ती’ कायम आहेच. शाळा संपल्यानंतर ‘ती’ त्याच्या आयुष्यात काय काय बदल घडवून आणते यावर भाष्य करणारी ही प्रेमळ वेब सिरीज लवकरच युट्युबच्या माध्यमातून स्टुडिओ ०९ या चॅनलवर प्रसिद्ध होणार आहे.

निसर्गाच्या कुशीत वसलेल्या साताऱ्यात वेब सिरीजच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून या वेब सिरीज बद्दल दिग्दर्शक आशिष पुजारी सांगतात की, ‘शाळा ही प्रत्येकाच्या आयुष्यात नेहमीच   खास राहिलेला विषय आहे. शाळा आपल्याला घडवते, शिकवते. अगदी त्याचप्रमाणे निरागस, निष्पाप वयात भेटलेली ‘ती’ देखील आपल्याला बऱ्याच गोष्टी नकळत सांगते, शिकवते. त्यामुळे ही वेब सिरीज म्हणजे ती शाळा तसंच ‘ती’ आणि शाळा अशा दोन्ही अर्थाची आहे.’

अल्पावधीतच या वेब सिरीजचा आशय आणि विषयाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे. याबाबत अधिक बोलताना स्टुडिओ ०९ प्रोडक्शनचे निर्माते धनेश रामचंद्र पाटील सांगतात की, ‘प्रत्येकाच्याच आयुष्यात घडणाऱ्या शाळेतल्या त्या अजाण वयातल्या जादुई प्रेमाची ही गोष्ट लवकरच प्रेक्षकांना स्टुडिओ ०९ प्रॉडक्शनच्या युट्युब चॅनलच्या माध्यमातून भेटीला येणार आहे. यात असलेले सर्वच कलाकार आणि पडद्यामागे असलेली टीम हि सक्षम असल्याने एक उत्तम कलाकृती प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळेल अशी आशा आम्हाला वाटते.’