सैन्य भरतीत विदर्भातील ३४ हजार तरुणांची हजेरी

0
8

भंडारा दि.१५: विदर्भातील १0 जिल्हयांसाठी भंडारा शहरात ६ ते १४ जानेवारी दरम्यान प्रथमच आयोजित केलेल्या सैन्यभरतीत ३४ हजार तरुणांनी उपस्थिती दर्शविली. यातील जवळपास २२ ते २५ टक्के तरुण भविष्यात भारतीय सैन्यात दाखल होतील, अशी माहिती पुणे येथील सैनिक भरतीचे उपमहानिर्देशक ब्रिगेडीअर दिनेश चढ्ढा यांनी दिली. 
येथील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात जिल्हा क्रीडाअधिकारी कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत ब्रिगेडीअर चढ्ढा बोलत होते. यावेळी सैन्य भरतीचे प्रमुख कर्नल महेंद्रकुमार जोशी जिल्हाधिकारी धीरजकुमार, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार यांच्यासह अन्य सैन्य अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी धीरजकुमार म्हणाले, भंडारा शहरात सैन्यभरती होणे ही या जिल्हय़ासाठी गौरवाची बाब आहे. याचा लाभ येथील तरुणांना मिळाला. स्वयंसेवी संस्थानी या भरतीसाठी वेळोवेळी भरपूर मदत केली. जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांनी सहकार्य केल्यामुळे ही सैन्य भरती यशस्वी ठरली.
बिग्रेडीअर चढ्ढा म्हणाले, नोंदणी झालेल्या एकूण उमेदवारांपैकी ३४ हजार तरुणांनी सैन्य रॅलीत सहभाग नोंदविला. गुणानूक्रमे मेरीटधर्तीवर उमेदवारांची सर्वस्तरीय चाचपणी घेण्यात आली. विशेष म्हणजे यासाठी जिल्हा प्रशासनाचे तसेच नागरिकांचे विशेष सहकार्यलाभले. मात्र तांत्रिक विभाग व लिपीक गटासाठी तरुणांचे अर्ज कमी प्रमाणात आल्याने त्यात मात्र आमची निराशा झाली. 
 मागील नऊ दिवसात विविध चाचणीचे टप्पे पार केलेल्या उमेदवारांची नागपूर येथे २८ फेब्रुवारीला लिखित चाचणी घेण्यात येणार आहे. ही भरती जिल्हा प्रशासनाच्या मदतीमुळे अत्यंत पारदश्री ठरल्याचेही ब्रिगेडीअर चढ्ढा यांनी आवर्जुन सांगितले.