४ थे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन २२ व २३ जानेवारीला गोंदियात

0
15

ङ्घ छत्तीसगढ मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह करतील उद्घाटन
ङ्घ समारोप व पुरस्कार वितरणाला केंद्रीय मंत्री गडकरी यांची उपस्थिती

गोंदिया, दि.१७ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि नशाबंदी मंडळ यांच्या संयुक्त वतीने २२ आणि २३ जानेवारी रोजी गोंदिया येथील स्वागत लॉन येथे देशातील चौथे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन छत्तीसगढचे मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह हे करतील. संमेलनाध्यक्ष म्हणून मुक्तागंण पुणेच्या मुक्ता पुणतांबेकर ह्या असतील. अध्यक्षस्थानी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले हे राहणार आहेत. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची सन्मानिय उपस्थिती तर प्रसिध्द गायक, संगीतकार आणि चित्रपट निर्माता अवधूत गुप्ते व सिनेअभिनेत्री निशा परुळेकर या संमेलनाला विशेषत्वाने उपस्थित राहणार आहेत. खा. प्रफुल पटेल, खा. नाना पटोले, आमदार सर्वश्री प्रा. अनिल सोले, नागो गाणार, राजेंद्र जैन, गोपालदास अग्रवाल, विजय रहांगडाले, संजय पुराम, गोंदिया जि.प.अध्यक्षा उषा मेंढे, गोंदिया नगराध्यक्ष कशिश जायसवाल यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून जि.प.च्या उपाध्यक्षा रचना गहाणे, स्वागताध्यक्ष म्हणून लाभणार आहे.

आज गोंदिया येथील विश्रामगृहात आयोजित पत्र परिषद सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी देशातील ४ थ्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबतची माहिती पत्रकारांना दिली. यावेळी प्रादेशिक उपायुक्त माधव झोड, नशाबंदी मंडळाच्या वर्षा विलास, स्वागताध्यक्ष रचना गहाणे व सामाज कल्याणचे सहायक आयुक्त सुनिल जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.
२२ जानेवारीला सकाळी ९ ते १०.३० पर्यंत व्यसनमुक्ती दिंडी काढण्यात येईल. १०.३० ते ११ या वेळेत प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येईल. ११ वाजता व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचे उद्घाटन छत्तीसगढचे मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह हे करतील. दुपारी १२.३० ते १.३० यावेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती वर्षानिर्मित्य त्यांचे व्यसनमुक्ती संदर्भातील विचार व स्मरणिकेचे प्रकाशन पाहूण्यांचे हस्त करण्यात येईल. दुपारी २.३० ते ३.३० यावेळेत व्यसनातून मुक्त झालेले आपले अनुभव करतील.
लोकांमध्ये व्यसनाचे वाढते प्रमाण, आव्हाने व उपचार या विषयावर दुपारी ३.३० ते सायंकाळी ५ या वेळेत दिपक पाटील, अमोल मडामे, डॉ. सूधीर भावे, डॉ. शैलेद्र पानगावकर, राहूल भंडारे, तुळसीदास भोईटे हे तज्ञ आपले विचार व्यक्त करतील. सायंकाळी ५ ते ६ यावेळेते कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून जिल्हयातील प्रसिध्दी साहित्यीक युवराज गंगाराम, अंजनाबाई खूणे, माणिक गेडाम, बापू ईलमकर आणि शारदा बडोले हे सहभागी होतील. सायकांळी ६.३० ते रात्री ८ या वेळेत संत साहित्यातील व्यसनमुक्तीचा संदेश यावर दिलीप सोळंके, गणेश हलमारे, ज्ञानेश्वर रक्षक, बाळासाहेब लबडे, श्यामसूंदर सुलर आणि प्राचार्या जुल्फी शेख हे आपले विचार व्यक्त करतील. रात्री ८ ते ८.३० या वेळेत कॉमेडी एक्सप्रेस फेम जयवंत भालेकर हे कॉमेडीचा एकपात्री प्रयोग सादर करतील. रात्री ८.३० वाजता कैकाडे महाराजाचे व्यसनमुक्तीवर किर्तन होईल.
२३ जानेवारील सकाळी ९ वाजता नशाबंदी मंडळाचा महिला ऑर्केस्ट्रा आपली कला सादर करतील. सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत व्यसनाधिनता थांबविण्यात महिलांचा सहभाग या विषयावर महिला आमदार निलम गोरे, माधूरी मिसाळ, वर्षा गायकवाड, शोभा फडणविस, मेधा कुलकर्णी, देवयानी फरांदे, विद्य चव्हाण, संगीता ठोमरे सहभागी होतील. संचालन वर्षा विलास ह्या करतील. दुपारी १२.३० ते २ या वेळेत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना ग्रामीण भागातील व्यसनाधीनता कितपत कारणीभूत आहे या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिध्द साहित्यीक तथा जेष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखेडे, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, गजानन अहमदाबादकर, संजय सोनटक्के आणि पाशा पटेल हे सहभागी होतील.दुपारी ३ वाजता व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचा समारोप होईल त्याचप्रमाणे २०१५-१६ या वर्षाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्रदान करण्यात येतील. समारोपाच्या व पुरस्कार वितरण कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी खात्याचे मंत्री श्री नितीन गडकरी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

२२ आणि २३ जानेवारी रोजी होणाऱ्या सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावेत असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव उज्वल उके आणि समाज कल्याण आयुक्त पियुष सिंह तसेच गोंदिया जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे यांनी केले आहे.