देहूत तुकाराम बीज उत्साहात

0
13

देहू- जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा ३६८ वा सदेह वैकुंठगमन बीजोत्सव सोहळा सुमारे तीन लाख वैष्णवांच्या साक्षीने शुक्रवारी संपन्न झाला.राज्यात दुष्काळ परिस्थिती असतानाही वैष्णवांचे दैवत असलेल्या जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठगमन सोहळा पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोप-यातून आलेल्या भाविकांनी जगद्‌गुरूंना दुपारी बारा वाजता श्री क्षेत्र देहूगाव येथे अभिवादन केले. भक्तीरसाच्या या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या दिंड्याच्या फडावर रात्रभर जागर, पहाटे काकड आरती, महापूजा, हरिपाठ व वीणा- टाळ- मृदंग यांच्या साथीत भजन कीर्तन व हरिनामाच्या जयघोषाने सारा आसमंत दुमदुमून निघाला.

तुकाराम बीजेच्या दिवशी यात्रेसाठी आलेल्या भाविकांच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या. काही भाविकांनी रात्रीपासूनच गर्दी केली होती. पहाटे तीन वाजल्यापासून पांडुरंगाच्या व श्री संत तुकाराम महाराजांच्या शिळामंदिरात दर्शनासाठी रांगेत उभे होते. सकाळी आठ वाजल्यापासून वैकुंठगमन मंदिराच्या परिसरात भरणा-या वैष्णवांच्या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी या वारक-यांची पाऊले आपोआप गोपाळपू-याकडे वळत होती.

सकाळपासूनच तळपत्या उन्हाची व वाहणा-या घामाच्या धारांची तमा न बाळगता भाविकांनी तुकारामाचा जयघोष केला.विश्वस्तांच्या हस्ते पहाटे साडेतीन वाजता काकड आरती झाली. पहाटे साडेचार वाजता शिळा मंदिरातील महापूजा अध्यक्ष व विश्वस्तांच्या हस्ते झाली. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पांडुरंगाची महापूजा झाली.

यानंतर सकाळी सहा वाजता वैकुंठगमन मंदिर येथील महापूजा उद्योजक मनीष अगरवाल यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर सकाळी साडेदहाच्या सुमारास पंचपदी अभंग झाल्यानंतर मंदिरातून पालखीचे वैकुंठगमन मंदिराकडे प्रस्थान झाले.