सामाजिक न्याय विभाग साजरी करणार बाबासाहेबांची जयंती

0
21

गडचिरोली,-भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती सामाजिक न्याय विभाग धुमधडाक्यात साजरी करणार असून, २ एप्रिलपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, यंदा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची १२५ वी जयंती जयंती असून, राज्य शासनाने बाबासाहेबांचे विचार घराघरात पोहचविण्यासाठी यंदाचे वर्ष समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करण्याचे ठरविले आहे. त्याअनुषंगाने २ एप्रिलला गडचिरोली येथील संस्कृती सभागृहात “दूत समतेचा…जागर महामानवाचा” या उपक्रमांतर्गत “परिवर्तन एक विचार” या दोन अंकी नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ६ एप्रिलला सकाळी ११ वाजता सामाजिक न्याय भवन येथे पत्रकारांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेला माहिती व जनसंपर्क विभागाचे माजी संचालक भि.म.कौसल, तसेच ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार यांना मुख्य मार्गदर्शक म्हणून निमंत्रित करण्याचा विचार सुरु आहे. याच दिवशी संध्याकाळी ६ वाजता इंदिरा गांधी चौकातील सभागृहात जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ.यशवंत मनोहर व प्रा.जैमिनी कडू यांना त्यासाठी निमंत्रित केले जाईल. नागरिकांनी या कार्यक्रमांना मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही विनोद मोहतुरे यांनी केले.